डोंबिवली – डोंबिवलीतील अनेक प्रवाशांनी डोंबिवली ते ठाणे कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाची बस सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्याकडे हा बस सेवेचा विषय उपस्थित केल्यावर ही बससेवा सुरू करण्याबाबत त्यांनीही सकारात्मकता दर्शवली आहे. येत्या महिनाभरात ही बससेवा सुरू होईल, असे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.

लोकलमधील प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. लोकलमधील प्रथम श्रेणीचे डबे प्रवाशांनी खचाखच भरलेले असतात. वातानुकूलित लोकल बदलापूर, टिटवाळा, कल्याण भागातून प्रवाशांनी भरून येतात. त्यामुळे डोंबिवलीतील एखाद्या प्रवाशाला ठाणे येथे जायचे असेल तर त्याला या गर्दीतून ठाणे रेल्वे स्थानकात उतरणे अवघड होते. प्रथम श्रेणी डबा, वातानुकूल लोकल प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या असतात. निवृत्तीकडे झुकलेल्या अनेक नोकरदारांना हा गर्दीचा प्रवास करणे अवघड झाले आहे. कार्यालयात तर वेळेत गेलेच पाहिजे, लोकलमधील गर्दीच्या घुसमटीतून निवृत्तीकडे झुकत चाललेल्या प्रवाशांना प्रवास करावा लागतो. अनेक ज्येष्ठ नागरिक, वृध्द यांना सकाळच्या वेळेत ठाणे येथे रुग्णालये, खासगी कामांसाठी, सरकारी कार्यालयांमधील कामासाठी जावे लागते. त्यांनाही लोकलमधील गर्दीमुळे रेल्वेचा प्रवास नकोसा वाटतो, असे आमदार मोरे यांनी सांगितले.

अशा अनेक प्रवाशांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आमदार राजेश मोरे यांच्याकडे डोंबिवली ते ठाणे कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाची बस सुरू करण्याची मागणी केली आहे. ही बस डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर मधील पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयाजवळून आणि एक बस डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील कोपर बस थांब्यावरून सोडण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. माणकोली पुलामुळे डोंबिवली ते ठाणे प्रवास आता अर्धा तासाचा झाला आहे. लोकल प्रवासाला कंटाळलेले अनेक प्रवासी या बस सेवेला प्राधान्य देतील. सकाळच्या वेळेत सकाळी सात ते सकाळी ११ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत या बसच्या अधिक प्रमाणात फेऱ्या ठेवल्या तर या माध्यमातून प्रवाशांना समाधानाने बसमधून प्रवास करणे शक्य होईल आणि केडीएमटीचा तिकीटाच्या माध्यमातून महसूल वाढण्यास मदत होईल, असे आपण आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांना सूचित केले आहे, असे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.

डोंबिवली ते ठाणे केडीएमटीची बस सेवा सुरू करावी, अशी डोंबिवलीतील अनेक नागरिकांची मागणी आहे. यासंदर्भात आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी ही बस सेवा सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या महिनाभरात ही बसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. या बसमुळे प्रवाशांची लोकलमधील गर्दीतून सुटका होणार आहे.-राजेश मोरे , आमदार, कल्याण ग्रामीण.

Story img Loader