कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील मुख्य वर्दळीचे रस्ते, पदपथांवर बहुतांशी विक्रेत्यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या न घेता फटाके विक्रीचे मंच उभारले आहेत. अनेक मंचांवर राजकीय पदाधिकाऱ्यांच्या प्रतिमा छळकून व्यापारी व्यवसाय करताना दिसत आहेत. परवानी न घेता फटाके विक्रीचे बहुतांशी मंच हे राजकीय मंडळींचे समर्थक असल्याची चर्चा आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेचे कर्मचारी विधानसभा निवडणूक कामात व्यस्त आहेत. या कामामुळे पालिका मुख्यालय, प्रभागातील अधिकारी, कामगारांना प्रभागातील फेरीवाले, फटाके विक्रीचे मंच याकडे लक्ष देण्यास सध्या वेळ नाही. तरीही काही प्रभाग साहाय्यक आयुक्त निवडणूक कामातील वेळात वेळ काढून कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हटविण्याचे काम करत आहेत. कल्याण, डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्ते, पदपथ, शहरांच्या अंतर्गत वर्दळीच्या रस्त्यांवर हे फटाके विक्रीचे मंच थाटण्यात आले आहेत.

हेही वाचा…प्रचार साहित्याच्या दरात वाढ

दिवाळीच्या दहा दिवसाच्या कालावधीत फटाके विक्रीतून चांगली कमाई होऊ शकते, या विचारातून काही तरूण भागीदारी पध्दतीने ही दुकाने चालवित आहेत. फटाके विक्रीच्या दुकानांना परवानगी घेताना पालिका, पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक विभाग अशा अनेक विभागांची ना हरकत आवश्यक असते. या हरकती मिळविताना हेलपाटे मारावे लागत असल्याने बहुतांशी व्यापारी परवानग्या न घेता फटाके विक्रीची दुकाने थाटत असल्याचे समजते.

गेल्या वर्षी पालिकेने डोंबिवली, कल्याणमध्ये पालिकेच्या परवानग्या न घेता थाटलेल्या दुकानांवर अग्निशमन दलाच्या वाहनांमधून पाण्याचे फवारे मारून फटाके प्रशासनाने विक्रेत्यांवर कारवाई केली होती. वर्दळीच्या रस्त्यांवरील फटाके दुकानात आगीची दुर्घटना घडली तर त्याची झळ लगतच्या मानवी वस्तीला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे ही दुकाने रस्ते, गल्लीबोळात सुरू करण्यास पालिकेचा प्रतिबंध आहे.

रस्ते, पदपथ अडवून कल्याण, डोंबिवलीत फटाके विक्रीचे मंच सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे संध्याकाळी नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले की या दुकानांसमोर ग्राहकांची झुंबड उडते. नागरिकांची गर्दी अधिक असल्याने वाहन चालकांना या रस्त्यांवरून वाहने चालविताना वाहने सावकाश चालवावी लागतात. त्यामुळे या रस्त्यांवर वाहन कोंडी होत आहे. डोंबिवलीतील फडके रस्ता, रेल्वे स्थानक भागातील परिसर, कल्याण मध्ये रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवर हे चित्र दिसत आहे. एकीकडे उमेदवारांच्या प्रचार पदयात्रा, त्यात रस्त्यावर फटाके विक्रीचे मंच आणि त्यात वाहन कोंडी होत असल्याने कल्याण, डोंबिवलीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. या सगळ्या परिस्थितीत रेल्वे स्थानक भागात पालिकेची पूर्ण क्षमतेची वाहनतळे नाहीत, त्यामुळे वाहने कोठे उभी करायची असे प्रश्न नागरिकांना पडत आहेत.

हेही वाचा…देहविक्री व्यवसायातून बाहेर पडत साकारले “स्वयंरोजगाराचे प्रकाशपर्व”; देहविक्री करणाऱ्या महिलांकडून पणत्यांची विक्री

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत फटाके विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी पालिकेच्या परवानग्या घेऊनच फटाके विक्रीची दुकाने सुरू करायची आहेत. पालिकेच्या परवानग्या न घेता सुरू करण्यात आलेल्या दुकानांवर प्रभाग साहाय्यक आयुक्तांकडून कारवाई केली जाणार आहे. आपले नुकसान टाळण्यासाठी विक्रेत्यांनी परवानगीला प्राधान्य द्यावे. हर्षल गायकवाड अतिरिक्त आयुक्त, कडोंमपा.