कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत गणेशोत्सव काळात गणेश मूर्ती आणि नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसने (पीओपी) तयार केलेल्या मूर्ती वापरावर बंदी घालण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने शासन आदेशानुसार बुधवारी घेतला. आयुक्त तथा प्रशासक डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी तसा आदेश बुधवारी जाहीर केला. केंद्रीय, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार पीओपीच्या मूर्ती वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली कडोंमपा हद्दीतील मूर्तिकारांनी शाडू, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, नवरात्रोत्सव काळात देवीच्या मूर्ती तयार करण्यावर भर द्यावा. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई केली जाणार आहे, असे आयुक्त डाॅ. दांगडे यांनी आदेशात म्हटले आहे.
मूर्तिकारांनी पाण्यात विरघळणाऱ्या पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यावर भर द्यावा. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाप्रमाणे कडोंमपा हद्दीतील मूर्तिकार, उत्पादक, विक्रेत्यांनी पालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. पालिकेच्या प्रभाग कार्यालयात या नोंदणीच्या प्रक्रिया पार पडणार आहेत. जे मूर्तिकार, विक्रेते, उत्पादक परवानगी घेणार नाहीत, त्यांना पालिका हद्दीत मूर्ती विक्रीला परवानगी देण्यात येणार नाही. पालिकेला अंधारात ठेऊन कोणी विक्रेत्याने नियमबाह्य गणेश, देवीच्या मूर्ती विकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
पालिकेकडून परवानगी घेतलेली एक नोंदणी प्रत मूर्तिकार, विक्रेते, उत्पादकांनी आपल्या दुकान, कारखान्याच्या दर्शनी भागात लावावी. या मूर्तींचे विसर्जन भाविकांनी पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात करावे. खाडी, नदी, ओढ्यामध्ये विसर्जन करुन नैसर्गिक स्त्रोत बंद करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. जल प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाय योजले आहेत. त्याची दखल उत्पादक, विक्रेत्यांनी घ्यावी. पर्यावरणपूरक मूर्तींना प्राधान्य द्यावे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.