कल्याण : येथील दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी देवीचा नवरात्रोत्सव आणि किल्ल्याच्या पायथ्याशी शुक्रवारपासून जत्रोत्सव सुरू झाला आहे. या जत्रोत्सवामुळे गोविंदवाडी बाह्यवळण रस्ता पुढील शनिवारच्या दसऱ्यापर्यंत दररोज संध्याकाळी पाच ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी वाहतूक विभागाकडून बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत भिवंडी कोन, शिळफाटा पत्रीपूल भागातून येणारी सर्व वाहने कल्याण शहरातील लालचौकी, शिवाजी चौकमार्गे पत्रीपूल दिशेने इच्छित स्थळी जातील, असे कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी सांगितले.

कल्याण शहराबाहेरून गोविंदवाडी वळण रस्त्याने धावणारी सर्व जड, अवजड, लहान वाहने एकाचवेळी शिवाजी चौकमार्गे इच्छित स्थळी जाण्यास गुरूवारपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे गुरूवारपासून कल्याण शहरातील पत्रीपूल ते शिवाजी चौक, लालचौकी या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते वाहन कोंडीत अडकून लागले आहेत. पालिका मुख्यालयातून सहजानंद चौकापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना एक तास लागत आहे. नोकरदार वर्ग, मालवाहू वाहनांचा या कोंडीचा सर्वाधिक फटका बसू लागला आहे.

हे ही वाचा…ठाणे: ९०५ वन हक्क दावेदारांना वनपट्टयांचे वाटप, श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाला यश

पत्रीपूल ते शिवाजी चौक, लालचौकी या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्याला लालचौकी, सहजानंद चौक, डाॅ. तेलवणे रुग्णालय, शिवाजी चौक, गुरुदेव हाॅटेल भागात अंतर्गत पोहच रस्ते आहेत. काही रस्ते कल्याण रेल्वे स्थानक भागात जातात. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील वाहनांना पुढे सरकण्यास जागा नसल्याने अंतर्गत पोहच रस्त्यावरील वाहने जागीच खोळंबून राहत आहेत. पत्रीपूल ते लालचौकी या आठ मिनिटाच्या प्रवासाला एक ते दीड तास लागत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे.

दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या १० दिवसाच्या काळात दुर्गाडी किल्ला येथील जत्रोत्सवामुळे वाहने कल्याण शहरात अडकून पडतात. त्यामुळे दुर्गाडी किल्ला येथील जत्रोत्सव किल्ल्याच्या एका बाजुला, जुन्या दुर्गाडी पुलाच्या दिशेने भरण्याची नागरिकांची मागणी आहे. या महत्वपूर्ण विषयाकडे कोणीही लक्ष देत नसल्याने प्रवाशांना दरवर्षी वाहन कोंडीला सामोरे जावे लागते.

हे ही वाचा…ठाणे, बदलापुरात गोंधळ; ठाण्यात प्रक्रियेवर आक्षेप, तर निरीक्षकांसमोरच बदलापुरात वाद

संध्याकाळी पाच वाजल्यानंतर शिळफाटा, भिवंडी, नाशिक भागातील मालवाहू अवजड वाहने कल्याण शहरातून पत्रीपूल दिशेने नवी मुंबई, पनवेल भागात जाण्यासाठी प्रवेश करतात त्यामुळे वाहन कोंडीत आणखी भर पडते. रात्री दहा वाजल्यानंतर तळोजा, उरण भागातून अवजड मालवाहू वाहनांची संख्या वाढली की कल्याण शहर रात्री उशिरापर्यंत वाहन कोंडीत अडकते. या कोंडीला कंटाळून बहुतांशी प्रवाशांनी रिक्षा, ओला उबर वाहनाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा…अक्षय शिंदे याला चकमकीत ठार करणाऱ्या संजय शिंदे यांना डिस्चार्ज

दुर्गाडी येथील जत्रोत्सवामुळे गोविंदवाडी वळण रस्ता संध्याकाळी पाच ते रात्री १२ वाजेपर्यंत दसऱ्यापर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत गोविंदवाडी वळण रस्त्याने धावणारी वाहने शिवाजी चौकमार्गे जाणार आहेत. कल्याण शहरातील वाहन संख्या वाढून वाहन कोंडी होत आहे. नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर टाळून जत्रेच्या ठिकाणी रिक्षा, ओलासारख्या वाहनांनी यावे. राजेश शिरसाठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग, कल्याण.