कल्याण – बऱ्याच विचारांती, खलबते करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले. कल्याण पूर्वेतून उल्हासनगरचे माजी नगरसेवक धनंजय बोडारे, तर पश्चिमेतून माजी नगरसेवक सचिन बासरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
या उमेदवारींमुळे कल्याण पूर्वेत महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांची लढत ठाकरे गटाचे धनंजय बोडारेंबरोबर होईल. २०१९ च्या निवडणुकीत बोडारे यांनी अपक्ष म्हणून भाजप उमेदवार गणपत गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांची लढत गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या बरोबर असेल. कल्याण पूर्वेत सुलभा गायकवाड यांचे काम न करण्याची भूमिका शिंदे शिवसेनेतील एका प्रभावी गटाने घेतली आहे. या गटाला वर्षावर बोलावून पक्षाच्या वरिष्ठांनी चांगलीच समज दिली असल्याने हा गट आता शांत झाला आहे. महेश गायकवाड अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असे कितीही वारे वाहत असले तरी त्यांना वरिष्ठांनी शांत राहण्याची समज दिली असल्याचे समजते. सुलभा गायकवाड या भाजपच्या उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना उघडपणे निवडणुकीच्या माध्यमातून त्रास दिला तर गृह खाते भाजपकडे आहे असेही चित्र असल्याने कल्याण पूर्वेत सध्या तरी महायुतीत शांततेचे वातावरण आहे.
हेही वाचा – महायुती विरोधकांना चारिमुंड्या चीत करेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीवर नाराज असलेला शिंदे शिवसेनेतील नाराज गट काय भूमिका घेतो यावरही बोडारे यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. कल्याण पूर्वेतील माजी महापौर रमेश जाधव, माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे उमेदवारीसाठी आग्रही होते. जाधव यांच्या नावासाठी जिल्हाप्रमुख विजय साळवी, तर बोडारे यांच्यासाठी संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत यांनी मातोश्रीवर मसलत केली. कल्याण पूर्वेत स्थानिकाला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका कल्याणमधील एका नेत्याने पक्षप्रमुखांसमोर घेतली होती. संपर्कप्रमुखांची मसलत कामी आल्याने बोडारे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. या चढाओढीत जाधव, पालांडे स्थानिक असूनही मागे पडले.
हेही वाचा – डोंबिवलीत पलावा येथे नायजेरीयन नागरिकाची पंधराव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या
बासरे यांना उमेदवारी
कल्याण पश्चिम शिवसेनेचा बालेकिल्ला. या विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी अभ्यासू नगरसेवक सचिन बासरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघात साईनाथ तारे यांचे नाव सुरुवातीला घेतले जात होते. मागील दोन ते तीन सत्रापासून सचिन बासरे विधानसभा उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. अखेर पक्षप्रमुखांनी बासरे यांना उमेदवारी देऊन त्यांच्या अभ्यासूपणाची दखल घेतली, असे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. कल्याण पश्चिमेतील शिवसेनाप्रमुखांचा बहुतांशी निष्ठावान शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. कल्याण पश्चिमेतील शिंदे शिवसेनेचा उमेदवार जाहीर होत नसल्याने इच्छुक उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक रवी पाटील, आणि कल्याण पश्चिमेतून उमेदवारी मिळाली नाहीतर बंडाच्या तयारीत असलेले भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यात अस्वस्थता आहे. भाजप, शिवसेनेला आता प्रत्येक उमेदवारी महत्वाची असल्याने बंडखोरीचे आव्हान दोन्ही पक्ष स्वीकारण्यास तयार नाहीत. ही बंडखोरी टाळण्यासाठी उल्हासनगरची शिवसेनेला, कल्याण पश्चिमेची भाजपला अशा उमेदवारीत अदलाबदल करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.