कल्याण – विनयभंग प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका मराठी कुटुंबाला कल्याण पूर्वेत एका परप्रांतीय कुटुंबाने शनिवारी मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणी आपणासह मराठी कुटुंबाने मारहाण केल्याची तक्रार परप्रांतीय कुटुंबाने मानपाडा पोलीस ठाण्यात रविवारी केली. परस्पर विरोधी या तक्रारींचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परप्रांतीय कुटुंबाने आपल्या विरुद्ध केलेली तक्रार खोटी आहे. आपणावर दबाव टाकण्यासाठी हे तक्रारीचे नाटक करण्यात आले आहे. आपल्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी परप्रांतीय कुटुंबाकडून देण्यात येत आहे, असे मराठी कुटुंबातील तक्रारदार महिलेने सांगितले.
मराठी कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीचा परप्रांतीय कुटुंबातील एका व्यक्तीने विनयभंग केला असल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे. या विनयभंग प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी मराठी कुटुंब परप्रांतीय कुटुंबीयांच्या दारात गेले. तेव्हा त्या कुटुंबाने आपल्या घरातील पती, आई आणि आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार मराठी कुटुंबीयांची आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने परप्रांतीय कुटुंबानेही मराठी कुटुंबातील तीन सदस्यांच्या विरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात रविवारी मारहाणीची तक्रार दाखल केली. या तक्रारीत परप्रांतीय कुटुंबातील प्रमुखाने म्हटले आहे, की तक्रारदार मराठी कुटुंबातील महिलेची मुलगी आमच्या घराच्या मोकळ्या जागेत खेळत होती. तिला मी येथे जास्त ओरडू नकोस असे सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने मराठी कुटुंबातील तीन सदस्य पती, पत्नी आणि मुलीची आजी यांनी एकत्रितपणे आपणास मारहाण केली. आपल्या पत्नीला मारहाण करण्यात आली. तक्रारदार महिलेने आपल्या डोळ्यावर दगड मारून दुखापत केली आहे, असे परप्रांतीय कुटुंबाने तक्रारीत म्हटले आहे.
यासंदर्भात मराठी कुटुंबातील तक्रारदार महिलेने सांगितले, की पोलिसांनी योग्य ती खातरजमा करावी. अन्यथा आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहोत आणि प्रसिद्धी माध्यमांना यासंदर्भात सर्व माहिती देणार आहोत.
परप्रांतीय कुटुंबातील महिलेने सांगितले, आम्हाला किरकोळ कारणावरून खूप मारहाण करण्यात आली. आपल्या पतीवर दगड फेकण्यात आला. त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. इमारतीत, पोलीस ठाण्याच्या परिसरात मराठी कुटुंबाने मारहाण केली. आपले पती नवी मुंबईत रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मराठी कुटुंबीयांना मारहाण प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. – राजेश मोरे, आमदार.
कल्याणमध्ये गेल्या दोन दिवसांपासून घडत असलेल्या घटनांची सत्ताधारी पक्षाने गंभीर दखल घ्यावी. अशा प्रकरणांच्या तपासात वेळकाढूपणा करून आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचे चित्र आहे. जे प्रकार सुरू आहेत ते थांबले पाहिजेत, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. – दीपेश म्हात्रे, शिवसैनिक, ठाकरे गट, डोंबिवली.