कल्याण : येथील चक्कीनाका भागातील एका १२ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या हत्येप्रकरणी कोळसेवाडी भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मुख्य सूत्रधार विशाल गवळी यांना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून, तर त्यांची पत्नी साक्षी गवळी यांना कल्याण शहरातून अटक केली आहे. अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांना दिली.
या हत्येप्रकरणी कल्याण शहर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांना सांगितले, अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांचा सीसीटीव्ही चित्रणातील माहितीच्या आधारे सहा पोलीस पथकांच्या साहाय्याने तपास सुरू आहे. या प्रकरणात विशाल गवळी याला बुलढाणा शेगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला संध्याकाळपर्यंत शहरात आणून त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाईल. या गुन्ह्यात विशालच्या पत्नीच्या सहभागाचा विचार करून पत्नी साक्षी यांनाही अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही लोक सहभागी आहेत का, यादृष्टीने सीसीटीव्ही चित्रणाचे आधारे शोध घेतला जात आहे. एक रिक्षा ताब्यात घेण्यात आली आहे.
हेही वाचा : ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
विशाल सराईत
विशालवर यापूर्वी विनयभंग, जबरी चोरी, मारहाण असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी दोन प्रकरणात त्याला तडीपाराची शिक्षा झाली होती. अलीकडेच तो जामिनावर बाहेर आला होता, असे पोलीस सुत्राने सांगितले. विशालची यापूर्वी दोन लग्ने झाली आहेत. कल्याण पूर्वेत त्याची दहशत होती.
पेहराव बदलण्याचे नाट्य
अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर विशाल कल्याण शहरातून पळून गेला. तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पोहचला. या भागात विशालची पत्नी साक्षी हिचे माहेर आहे. तेथे तिचे नातेवाईक राहतात. कल्याणच्या पोलिसांनी मुलीच्या हत्यप्रकरणी विशाल गवळीशी संबंधित सर्व नातेवाईकांना चौकशीसाठी मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यावर विशाल बुलढाणा येथे गेल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांची पथके बुलढाणा येथे त्याचा शोध घेत होते.
केशकर्तनालयात दाढी
विशालला दाढी आहे. आपण कोणाला ओळखू नये म्हणून विशालने बुलढाणा येथे एका केशकर्तनालयात दाढी केली. त्यानंतर पेहराव बदलून तो बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस पथकांनी त्याच्यावर बुधवारी सकाळी झडप घातली, असे पोलीस सुत्राने सांगितले.
चक्कीनाका येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी विशाल गवळीला बुलढाण्यातील शेगाव येथून ताब्यात घेतले आहे. त्याची पत्नी साक्षी यांना अटक केली आहे. या प्रकरणात अन्य काहींचा सहभाग आहे का यादृष्टीने तपास केला जात आहे. सहा पथके याप्रकरणातील मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
अतुल झेंडे (पोलीस उपायुक्त, कल्याण)