कल्याण : कल्याण पूर्वेतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील महिला पदाधिकारी आशा रसाळ यांना कोळसेवाडी पोलिसांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे नोटीस बजावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपणाकडून किंवा आपल्या समर्थकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशा रसाळ कल्याण पूर्वेतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लढवय्या महिला पदाधिकारी म्हणून ओळखल्या जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिंदे शिवसेनेने डोंबिवली, कल्याण परिसरातील जुन्या शिवसेना शाखा आपल्या ताब्यात घेण्याचे सत्र सुरू केले होते. या कालावधीत कल्याण पूर्वेत कोळसेवाडीमधील जुनी शिवसेना शाखा शिंदे शिवसेनेकडून ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू होते.

हेही वाचा :ठाकरे गटाचा माजी आमदार शिंदे गटात; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

यावेळी ठाकरे आणि शिंदे शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांना भिडले होते. शिवसेनेचा एक बडा नेता यावेळी उपस्थित होता. ठाकरे गट शिवसेना शाखेचा ताबा सोडण्यास तयार नव्हता. तर या नेत्याच्या पाठबळामुळे शिंदे शिवसेनेचे शिवसैनिक कोळसेवाडी शिवसेना शाखा ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते. या दोन्ही गटाकडून सुरू असलेल्या झटापटीच्यावेळी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आशा रसाळ यांनी शिंदे शिवसेनेच्या एका बड्या नेत्याच्या शर्टाची गळपट्टी (काॅलर) पकडून आम्ही कोणत्याही परिस्थितीत शाखेचा ताबा सोडणार नाही असे सुनावले होते. हा विषय नंतर दाबण्यात आला. पण प्रत्यक्षदर्शींनी मात्र हा प्रकार बघितला होता.

ठाकरे गटाने कल्याण पूर्वेत दिलेल्या उमेदवाराविषयी यापूर्वी आशा रसाळ यांनी आक्रमक भूमिका मांडली होती. आशा रसाळ या लढवय्या महिला शिवसैनिक असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी आशा रसाळ यांना नोटीस बजावली आहे. आपण किंवा आपल्या समर्थकांकरवी असे कोणतेही कृत्य करू नये की ज्यामुळे दखलपात्र गुन्हा होईल आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आपणाकडून निर्माण होईल, असे नोटिसीत म्हटले आहे.

हेही वाचा :Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?

कल्याण पूर्वेत माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड आणि अपक्ष उमेदवार महेश गायकवाड, ठाकरे गटाचे धनंजय बोडारे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. या चुरशीच्या लढतीच्या ठिकाणी कायदा सु्व्यवस्थेचा प्रश्न नको म्हणून पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. अशाप्रकारची सन्मानपत्र ही निष्ठावंतांना पोलीस विभागाकडून मिळत असतात, अशा प्रतिक्रिया कल्याण पूर्वेतील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी दिल्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan east shivsena thackeray faction leader asha rasal received police notice for law and order css