कल्याण : कल्याण पूर्व चक्कीनाका भागात गेल्या वर्षी बालिकेवर लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या विशाल गवळी यानी केली होती. याप्रकरणात विशाल गवळी पत्नी साक्षीसह तुरुंगात आहे. विशालच्या तीन भावांना पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून सातारा येथे तडीपार करण्यात आले आहे. ही परिस्थिती असताना रविवारी मध्यरात्री तीन तरूण बालिका हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांच्या घरासमोर मध्यरात्री दोन वाजता समोर आले. त्यांनी दहशतीचा अवलंब करत पीडित कुटुंबीयांना शिवीगाळ केली. जामीन झाला नाही तर आम्ही एके ४७ घेऊन येतो आणि दाखवतो, अशी धमकीची भाषा पीडित कुटुंंबीयांना केली आहे.
याप्रकाराने पीडित कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान तीन तरूण एका दुचाकीवरून पीडित कुटुंबीयांच्या चक्कीनाका येथील घरासमोर आले. त्यांनी पीडित कुटुंबीयांच्या घरासमोर धिंगाणा घातला. शिवीगाळ करत दगडी फेकल्या. काही खिळे प्रवेशव्दाराच्या बाजुला ठोकण्याचा प्रयत्न केला, भाजीचे ट्रे फेकून दिले. मोठ्याने ओरडा करत ते घरासमोर गोंधळ घालत होते, असे पीडित कुटुंबातील एका सदस्याने माध्यमांना सांगितले.
आमच्या माणसाला जामीन झाला नाहीतर आम्ही एके ४७ घेऊन येतो आणि तुम्हाला दाखवतो, अशी धमकी तरूणांनी पीडित कुटुंबीयांना दिली. घरातील अल्पवयीन मुलगी गेल्याचे दुख समोर असताना पुन्हा तरूणांच्या दहशतीला बालिकेच्या कुटुंबीयांना सामोरे जावे लागत आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आपण तक्रारी केल्या आहेत. कुटुंबीयांच्या सुरक्षेची मागणी केली आहे, असे सदस्याने सांगितले.
पोलिसांनी विशाल गवळीच्या तिन्ही भावांना सातारा भागात तडीपार केले असले तरी ते चोरुन लपून कल्याणमध्ये राहत आहेत, असे पीडित कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. घराबाहेर तरूणांनी केलेल्या धिंगण्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कोळसेवाडी पोलिसांना याप्रकरणी संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
पीडित कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासन घेत आहे. त्यांच्या घराबाहेर कोणी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.