कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथे राहत्या इमारतीच्या गच्चीतून आत्महत्या केलेल्या महाविद्यालयीन तरूणीच्या मृत्यूमागे उच्चभ्रू वस्तीमधील मुलांचा सहभाग आहे. यामध्ये विकासकांच्या दोन मुलांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी सात तरूणांसह एक तरूणी अशा आठ जणांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची दखल आता थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी घेतलीय.

नक्की वाचा >> मित्रांकडून गैरफायदा; लैंगिक अत्याचार अन् अश्लील व्हिडीओ; कल्याणमध्ये तरूणीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी तरूणांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी दृष्टीने पोलिसांनी तपास करावा. या प्रकरणात पीडित कुटुंबावर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. याप्रकरणाचा सविस्तर अहवाल राज्य महिला आयोगाकडे पाठवून देण्यात यावा, असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कोळसेवाडी पोलिसांना दिले आहेत. मयत मुलीच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या सोसायट्यांमध्ये आरोपी तरूण राहत होते. मयत मुलगी, आरोपी तरूण मूळ उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत.

संरक्षण द्या

आरोपी मुले उच्चभ्रू कुटुंबातील आहेत. आम्ही सामान्य आहोत. त्यांच्याकडून आमच्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी मयत तरूणीच्या कुटुंबीयांनी कोळसेवाडी पोलिसांकडे केली आहे. स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी घडल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून या प्रकरणातील आरोपींची सखोल चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा होईल या दिशेने तपास करावा, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

नक्की वाचा >> “…तर आम्ही तिच्या पाठिशी उभे राहिलो असतो”; अश्लील Video Viral होण्याच्या भितीने आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईची हळहळ

पोलिसांचे आवाहन

तरूणी, महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लिल, लैंगिक अत्याचाराच्या चित्रफिती तयार करून त्या समाज माध्यमावर प्रसारीत करण्याची धमकी कोणी देत असेल तर अशा धमक्यांना न घाबरता तरूणी, महिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात येऊन घडत असलेल्या प्रकाराची माहिती द्यावी. संबंधित महिला तक्रारदाराचे नाव गुप्त ठेऊन त्रास देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई पोलिसांकडून केली जाईल, असे आवाहन कल्याण परिमंडळ तीनमधील पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

गेल्या वर्षीही डोंबिवलीत सागाव-भोपर येथील एका तरूणीच्या लैंगिक अत्याचाराच्या अश्लिल चित्रफिती तयार करून त्या समाज माध्यमात प्रसारीत करण्याची धमकी देऊन ३३ तरूण आळीपाळीने तरूणीवर लैंगिक अत्याचार करत होते. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. कल्याण पूर्वेतील तरूणीच्या आत्महत्येनंतर अश्लिल चित्रफितींचा विषय पुढे आल्याने पोलिसांनी अशाप्रकारे तरूणींना कोणी त्रास देत असेल तर त्यांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan girl suicide case 2 accused are sons of rich builder scsg
Show comments