कल्याण : मेल, एक्सप्रेसमध्ये प्रवासी म्हणून प्रवास करून रात्रीच्या वेळेत झोपी गेलेल्या प्रवाशांच्या जवळील सोन्याचा ऐवज, त्यांचे मोबाईल चोरी करणाऱ्या नवी मुंबईतील रबाळे गावातील एका २९ वर्षाच्या चोरट्याला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने बदलापूर शहरातून शिताफीने अटक केली आहे. या चोरट्याकडून पोलिसांनी पाच लाखाचा ऐवज जप्त केला आहे. त्याने सहा गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे.

सहिमत अंजुर शेख (२९) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. मेल, एक्सप्रेसमध्ये रात्रीच्या वेळेत प्रवाशांचे मोबाईल, पिशवीतील सोन्याचा ऐवज चोरीला जाण्याचे प्रमाण वाढून यासंदर्भातच्या तक्रारी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल होत होत्या. चोरट्यांची चोरी करण्याची पध्दत एकच होती. त्यामुळे ठराविक चोरटे हा प्रकार करत असल्याचा पोलिसांना संशय होता.

कल्याण गु्न्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पथकाच्या साहाय्याने रात्रीच्या वेळेत मेल, एक्सप्रेसमध्ये साध्या वेशात फिरून सराईत चोरट्याचा शोध सुरू केला होता. शनिवारी निझामउद्दीन एक्सप्रेसने एक महिला प्रवास करत होती. अप्पर कोपर रेल्वे स्थानक सोडल्यानंतर या महिलेची पर्स चोरीला गेली होती. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती.

पोलिसांनी या चोरीचा तपास करताना त्यांना नवी मुंंबईतील रबाळे गावात राहत असलेला सहिमत शेख हा या चोऱ्या करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सहिमत शेख याची माहिती काढून त्याला बदलापूर येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू केल्यावर त्याने डोंबिवली, कल्याण रेल्वे हद्दीत चोरीच्या एकूण सहा चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून मोबाईल, सोन्याचा ऐवज, आयपॅड असा पाच लाख रूपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

सहिमतने अशाप्रकारच्या अन्य भागात काही चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रोहीत सावंत, उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, संदीप गायकवाड, हवालदार रवींद्र ठाकुर, लक्ष्मण वळकुंडे, अजय रौंधळ, राम जाधव, प्रमोद दिघे, स्मिता वसावे, पद्मा केंजळे, रुपेश निकम, सुनील मागाडे, मंगेश खाडे, विक्रम चावरेकर, हितेश नाईक, योगेश अदाटे यांच्या पथकाने केली.