Illegal Chawls in Titwala कल्याण : टिटवाळा कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा चाळींचे सर्वात मोठे आगर म्हणून डोंबिवलीतील ह प्रभाग ओळखला जातो. त्यानंतर टिटवाळा भागातील अ प्रभागाची गणना होते. टिटवाळा भागातील उंभर्णी भागात बनेली येथील भूमाफियाने ३० खोल्यांच्या चाळी बांधून त्यामधील घरे सामान्य लोकांना विकून घर खरेदीदारांची फसवणूक केली आहे. पालिकेकडे यासंदर्भात तक्रारी प्राप्त होताच, पालिकेने या भूमाफिया विरुध्द टिटवाळा पोलीस ठाण्यात ‘एमआरटीपी’चा गुन्हा दाखल केला आहे.
अब्दुल अतिक फारूकी (रा. बनेली, टिटवाळा) असे भूमाफियाचे नाव आहे. ते के. एफ. एन्टरप्रायझेस नावाने उंभर्णी भागात बेकायदा चाळी बांधतात. ३० खोल्यांच्या या बेकायदा चाळींची समाज माध्यमांत जाहिरात प्रसिध्द करून या चाळींमधील खोल्या रास्त दरात सामान्यांची फसवणूक करून विकल्या. या बेकायदा चाळी उभारताना अब्दुल फारूकी यांनी पालिकेच्या कोणत्याही परवानग्या घेतल्या नाहीत.
हेही वाचा…डोंबिवली : निळजे ते लोढा संकुल दरम्यानच्या बोगद्यातील पाण्याने प्रवासी त्रस्त
अब्दुल फारूकी याच्या चाळीतील खोल्या विक्रीची जाहिरात पालिका आयुक्तांपर्यंत पोहचल्या. वरिष्ठांनी अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या. साहाय्यक आयुक्त, अधीक्षक नंदकिशोर वाणी, राजू शिलवंत, रवींद्र गायकवाड यांनी उंभर्णी भागात दौरा करून भूमाफिया अब्दुल यांनी उभारलेल्या बेकायदा चाळींची पाहणी केली. पालिकेच्या परवानग्या न घेता, सामान्य नागरिकांची फसवणूक करून या बेकायदा चाळींची उभारणी केल्याबद्दल अधीक्षक वाणी यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात अब्दुल फारूकी याच्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी एमआरटीपीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. टिटवाळा परिसरातील उंभर्णी, बनेली भागातील पालिकेच्या आरक्षित, सरकारी, वन जमिनीवर भूमाफियांनी पाच हजाराहून अधिक बेकायदा चाळी पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने उभ्या असल्याच्या तक्रारी आहेत. या चाळींवर कारवाई करावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर मागील अनेक वर्ष प्रयत्नशील आहेत. पालिका अधिकारी त्यांच्या तक्रारीची दखल घेत नाहीत, असे देशेकर यांनी सांगितले. या बेकायदा चाळींमुळे या भागातील पावसाळ्यातील नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बंद झाले आहेत. त्यामुळे टिटवाळा परिसरात मुसळदधार पाऊस असला की पूर परिस्थिती निर्माण होते.
हेही वाचा…उल्हासनगर : पप्पू कलानीपुत्र ओमी कलानी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
टिटवाळ्यानंतर डोंबिवलीतील ह प्रभागात सर्वाधिक बेकायदा चाळींची बांधकामे सुरू आहेत. बेकायदा बांधकामांवर यापूर्वी कुचराई करणारे अधिकारी आयुक्तांनी या प्रभागांत नियुक्त केल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे तक्रारदार सांगतात.
हेही वाचा…डोंबिवलीत घराच्या छतावर चढलेल्या विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू
टिटवाळ्यात बेकायदा जोरात
टिटवाळा भागातील मोरयानगर, गणेशवाडी, माता मंदिर, डोंगरवाली मय्या, उंभर्णी, बनेली भागात बेसुमार बेकायदा चाळींची बांधकामे सुरू आहेत. माता मंदिराजवळ बल्याणी रोडवर सरनोबत नगर समोर पालिकेच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याने बेकायदा गाळा बांधला आहे. यासंदर्भात अ प्रभागात तक्रारी झाली आहे. अ प्रभागात वर्षानुवर्ष ठाण मांडून असलेल्या कामगार, चालकाच्या आशीर्वादाने ही बेकायदा बांधकामे उभी राहत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून केल्या जात आहेत.