कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्डयांमध्ये माती, खडी टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये चिखल होऊन वाहनांचा वर्दळीमुळे खडी रस्त्यावर येत आहे. दरवर्षीच्या या खड्ड्यांच्या दुखण्यामुळे प्रवासी हैराण आहेत. डोंबिवली, कल्याणमधील काँक्रीटचे रस्ते सोडले तर बहुतांशी डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापू्र्वीची खड्डे भरणीची कामे अनेक भागात पालिकेच्या ठेकेदाराकडून पूर्ण करण्यात आली नाहीत.
त्याचा फटका आता पाऊस सुरू झाल्यानंतर खड्ड्यांच्या माध्यमातून नागरिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. घरापासून शाळेपर्यंत पायी जाणाऱ्या विद्यार्थी, पालकांचे या खड्ड्यांमुळे सर्वाधिक हाल होत आहेत. सकाळच्या वेळेत कामावर निघालेल्या, कामावरुन परतणाऱ्या नोकरदारांना खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरातून महामार्गावरुन सुसाट येणारी वाहने कल्याण, डोंबिवलीत प्रवेशकर्ती झाली की त्यांना खड्ड्यांच्या त्रासामुळे संथगती प्रवेश करावा लागतो.
हेही वाचा >>> विरारमध्ये अॅसिड हल्ला, व्यावसायिक जखमी, दोन हल्लेखोर फरार
डोंबिवलीतील खड्डे
डोंबिवली पूर्व भागात पाथर्ली रस्ता, टिळक रस्ता, ब्राम्हण सभेसमोरील रस्ता, टिळकनगर टपाल कार्यालय रस्ता, डोंबिवली जीमखाना रस्ता, शिवम रुग्णालय ते के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय रस्ता, शिवमंदिर ते दत्तनगर, सुनीलनगर, आयरेगाव, एमआयडीसीतील सर्वच डांबरी रस्त्यांची चाळण झाली आहे. डोंबिवली पश्चिमेत गणेशनगर, चिंचोड्याचा पेट्रोलपंप रस्ता, गरीबाचापाडा श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी रस्ता, रेतीबंदर ते सत्यवान चौक रस्ता, उमेशनगर मासळीबाजार रस्ता, सुभाष रस्ता या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. कल्याणमध्ये कोळसेवाडी, काटेमानिवली, चिंचपाडा, नेवाळी नाका, मलंग रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. कल्याण पश्चिमेत मुरबाड रस्ता, मोहने, आंबिवली, शहाड पूल, टिटवाळा, बल्याण, वासुंद्री, २७ गाव भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे.
हेही वाचा >>> कल्याण: नालंदा विद्यालयातील शिक्षिकेने केली बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक
लोकप्रतिनिधी या महत्वपूर्ण विषयावर मौन बाळगून असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. राजकीय विषयावर ट्वीट, फेसबुकवर व्यक्त होणारे लोकप्रतिनिधी, त्यांचे समर्थक खड्डे विषयावर गप्प का आहेत, असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत. पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरांमधील रस्ते पाऊस असला तरी सुस्थितीत असतात, मग कल्याण डोंबिवली शहरांना पावसाळ्यात खड्ड्यांची भूतबाधा का होते, असे प्रश्न नागरिकांकडून केले जात आहेत.
२० कोटी खर्च
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खड्डे भरणीच्या कामासाठी पालिकेने २० कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे. १० प्रभागांच्या हद्दीत रस्त्यांवर पडणारे खडडे या निधीतून भरण्यात येणार आहेत. प्रभागातील बांधकाम विभागाचा उप, कनिष्ठ अभियंता यांनी खड्डे भरणीच्या कामाचे नियंत्रक म्हणून काम करायचे आहे. या अधिकाऱ्यांवर शहर अभियंता यांचे नियंत्रण असणार आहे.
“ पावसाचा अंदाज घेऊन खड्डे भरणीची कामे सुरू आहेत. पाऊस असेल तर खडी, माती आणि पाऊस नसेल तर काँक्रीट खडी असे मिश्रण टाकून खड्डे भरणीची कामे केली जात आहेत.” – मनोज सांगळे, कार्यकारी अभियंता.