कल्याण – कल्याण-मुरबाड मार्गावरील वरप गावाच्या हद्दीतील टाटा कंपनीच्या आवारात बुधवारी मध्यरात्री दीड वाजताच्या दरम्यान बिबट्याचा वावर आढळून आला. कंपनीच्या आवारातील सीसीटीव्ही मध्ये बिबट्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत. कंपनी प्रशासनाकडून ही माहिती तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वन विभागाने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या भागात गस्त सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण पासून पाच किलोमीटर अंतरावरील वरप गाव उल्हास नदीच्या काठी आहे. हा भाग बारवी धरण जंगल परिसर, मलंग गडाच्या डोंगरा लगत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागात श्रीराम अनुग्रह सोसायटीच्या आवारात बिबट्या शिरला होता. बारा तासाच्या प्रयत्नानंतर त्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या बचाव पथकाला यश आले होते.

हेही वाचा >>> जुनी डोंंबिवलीत कुऱ्हाडीची  दहशत पसरविणाऱ्याला अटक

वरप गाव हद्दीत टाटा कंपनी आहे. कंपनीच्या आवारात बिबट्याने आवारात शिकार शोधण्यासाठी संरक्षित भिंतीवरून प्रवेश केला असावा. आतील भागात भक्ष्य न मिळाल्याने त्याने कंपनीच्या मुख्य प्रवेशव्दारातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. प्रवेशव्दार बंद असल्याने त्याला बाहेर जाता आले नाही. आतील भागातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत तो पुन्हा संरक्षित भिंतीवरून परत गेला असण्याचा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

कंपनीच्या आतीला भागात चारही बाजुने लख्ख प्रकाशाचे दिवे असल्याने कंपनीच्या आवारातील सीसीटीव्हीमध्ये बिबट्याच्या हालचाली स्पष्टपणे कैद झाल्या आहेत. वरप भागात बिबट्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी गुरूवारी दिवसभर या भागात त्याचा शोध घेत होते. वरप परिसरातील ग्रामस्थांना बिबट्या दिसल्यास तात्काळ वनाधिकाऱ्यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्या जवळपास आढळून आल्यास नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी ग्रामस्थांना माहिती देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी गोधन घराजवळील गोठ्यात बांधले असेल तर त्याचे दरवाजे भक्कमपणे बंदिस्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, कालांतराने कळेलच; राज ठाकरे

पावसाळ्यात वाढलेले जंगलातील गवत आता सात ते आठ फूट उंचीचे झालेले असते. जंगलातील झुडपे पानाफुलांनी भरून गेलेली असतात. अशा निबीड जंगलात जंगली प्राण्यांना भक्ष्य मिळणे आणि पकडणे अवघड जाते. त्यामुळे ऑक्टोबर नंतर जंगली प्राणी भक्ष्याच्या शोधासाठी नागरी वस्तीकडे येतात, असे एका वन्यजीव अभ्यासकाने सांगितले. कल्याण विभागाच्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना संपर्क साधला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan leopard news leopards roam in varap village on kalyan murbad road zws
Show comments