कल्याण : रेल्वे प्रवाशाशी सलगी करून त्याला बोलण्यात गुंतवून प्रवाशाला बिस्किटमधून गुंगीचे औषध खाण्यास द्यायचे. प्रवासी गुंगी येऊन पडला की त्याच्या जवळील किमती ऐवज किंवा त्याच्या पिशवीतील रोख रक्कम, मोबाईल घेऊन पळून जाणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. रामसुरत रामराज पाल (४६) असे आरोपीचे नाव आहे. तो मुळचा उत्तरप्रदेशातील आहे. तो सध्या भिवंडी येथे वास्तव्यास आहे. भिवंडीत राहून तो कल्याण ते मुंबई परिसरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या पिशव्या, मोबाईल चोरण्याचे धंदे करत होता.

कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी सांगितले, मंगळवारी दुपारी एक प्रवासी कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर उभा होता. त्याला उत्तरप्रदेशात जायचे होते. त्याच्या जवळ एक ते दोन पिशव्या होत्या. तो प्रवासी उत्तरप्रदेशात जाणाऱ्या एक्सप्रेसची वाट पाहत उभा होता. आरोपी रामसुरत याने त्या प्रवाशाजवळ जाऊन तू कोठे चालला आहेस, अशी विचारणा केली. त्याने आपण उत्तरप्रदेशात चाललो आहोत, असे सांगितले. रामसुरतनेही मीही उत्तरप्रदेशातील असून तेथेच जाणार आहे, असे स्पष्ट केले. रामसुरतने त्या प्रवाशाशी सलगी वाढून त्याच्याशी बोलणे सुरू केले. या बोलण्यात आपणास भूक लागली आहे असे बोलून आरोपी रामसुरत याने स्वताजवळील बार बोर्न बिस्किट काढून खाण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा…डोंबिवलीतील वाहन कोंडी आठ दिवसात सोडवा, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांचे आदेश

प्रवाशाची नजर चुकवून रामसुरतने प्रवाशाला द्यायच्या बिस्किटला गुंगीचे औषध लावून ते प्रवाशाला खाण्यास दिले. आपला सोबती आपणास बिस्किट देत आहे म्हणून प्रवाशाने ते खाल्ले. तेवढ्यात प्रवाशाला तात्काळ गुंगी येऊन त्याचे डोके जड झाले. त्याला उलटी, मळमळ सुरू झाली. प्रवासी बसल्या जागीच चक्कर येऊन कोसळला. या संधीचा गैरफायदा घेत रामसुरतने प्रवाशाची पिशवी उचलून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा..डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांविरुध्द आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू, नगरविकास विभागाचे कडोंमपाला कारवाईचे आदेश

गस्तीवरील रेल्वे पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने रामसुरतला रोखून पिशवी कोणाची आहे अशी विचारणा केली. रामसुरतची बोबडी वळली. पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तातडीने रामसुरतला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याची कसून चौकशी करताच त्याने आपण एका प्रवाशाला बिस्किटातून गुंगीचे औषध देऊन त्याची पिशवी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने स्कायवाॅकवरील गुंगी येऊन पडलेल्या प्रवाशाला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले. पोलिसांनी रामसुरतवर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी सुरू केली आहे. रामसुरतने गुंगीचे औषध कोठुन आणले. त्याने आतापर्यंत अशाप्रकारे किती चोऱ्या केल्या आहेत याचा तपास पोलिसांनी सुुरू केला आहे. कुर्ला रेल्वे स्थानकात येथेही रामसुरतवर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. रामसुरत हा सराईत अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.