कल्याण – कल्याण लोकसभा मतदारसंघाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने अधिक प्रमाणात विकास कामांसाठी निधी मिळाला. या मतदार संघाला धडाडीचा उमदा श्रीकांत शिंदे यांच्या सारखा खासदार मिळाला हे या मतदारसंघाचे भाग्य आहे. या मतदारसंघात खासदार शिंदे यांनी विकासाची इतकी कामे केली आहेत की कल्याण लोकसभेची आता मला चिंता नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री कल्याण महोत्सवाला भेट दिल्यानंतर केलेल्या छोटेखानी भाषणात व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण पूर्वेत शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या प्रयत्नाने कल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅक्टर श्रीकांत शि्ंदे यांनी भेट दिली. यावेळी कल्याण डोंबिवली पालिका आयु्क्त डाॅ. इंदुराणी जाखड, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे उपस्थित होते.

हेही वाचा >>> ठाण्यातही विशेष मुलांसाठी उपचार केंद्र सुरू होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

रस्ते, वीज, पाणी, कचरा हे शहर सुधारणेतील महत्वाचे टप्पे आहेत. ही लोकांची कामे प्राधान्याने झाली पाहिजेत. पालिकेला नवीन आयुक्त लाभल्या आहेत. आयुक्तांनी शहराची गरज ओळखून यापूर्वी प्रस्तावित असलेले, होऊ घातलेले, कोंडी सोडविणारे रस्ते प्राधान्याने हाती घ्यावेत. या कामांसाठी पालिकेला निधी कमी पडू दिला जाणार नाही. शहरातील रस्त्यांवरून महामार्गाला लागण्यासाठी फक्त १० मिनिटाचा अवधी लागला पाहिजे, असे वळण रस्ते विकासित करण्यासाठी खासदार शिंदे प्रयत्नशील आहेत. या कामांसाठी शासन सर्व सहकार्य करील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कल्याण लोकसभेची चिंता नसल्याने मी आता राज्याच्या विविध भागाचा दौरा करणार आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तिने मुख्यमंत्री या भूमिकेत राहून जिल्हा आपल्या ताब्यात राहिल यादृष्टीने काम करावे आणि मला थोडी राज्यासाठी मोकळीक द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. समाजाला एकत्र आणण्यासाठी महोत्सव खूप महत्वाची भूमिका बजावतात, असे दिवंगत आनंद दिघे नेहमी सांगत असत. या पार्श्वभूमीवर महेश गायकवाड यांनी आयोजित केलेला कल्याण महोत्सव कौतुकास्पद आहे. याठिकाणी सर्व प्रकारच्या कलाकारांना, गुणवंतांना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळते. विविध प्रकारचा समाज अशा महोत्सवातून एकत्र येतो. समाज संघटनासाठी असे महोत्सव महत्वाची भूमिका बजावतात, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan lok sabha constituency got more funds for development due to mp shrikant shinde efforts says cm eknath shinde zws
Show comments