डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विकासाची अनेक कामे केली आहेत. अनेक विकास प्रकल्प या भागात शासनाच्या माध्यमातून आणले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार शिंदे यांच्या कार्यपध्दतीवर नागरिक समाधानी असल्याने ते यावेळीही विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी ब्राह्मण सभेत आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केला.
यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, डोंबिवली भाजपचे पदाधिकारी शशिकांत कांबळे, विशू पेडणेकर, समीर चिटणीस, प्रज्ञेश प्रभुघाटे, माजी नगरसेवक संदीप पुराणिक उपस्थित होते. खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रचारकार्याला सुरूवात करावी. आपणास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४०० पार हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. खासदार शिंदे यांनी यापूर्वीही आणि मागच्या पाच वर्षाच्या काळात कल्याण लोकसभा हद्दीतील विधानसभा मतदारसंघात विकासाची अनेक कामे केली आहेत. बहुतांशी कामे मार्गी लागली आहेत. हजारो कोटीचे काँक्रीट रस्ते कामे या भागात सुरू आहेत. काही कामे पूर्ण झाली आहेत. या विकास कामांमुळे नागरिक समाधानी आहेत. या समाधानाची पावती आपणास येत्या लोकसभा निवडणुकीत नक्की मिळेल असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…‘आनंदाचा शिधा’ दोन महिने बंद; आचारसंहितेमुळे मोफत वस्तू वाटपास प्रतिबंध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपणास पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱी यांनी युतीधर्म पाळून कामाला लागावे. यापूर्वीचे सर्व मतभेद कार्यकर्त्यांनी विसरायचे आहेत, असे आदेश मंत्री चव्हाण यांनी दिले.