ठाणे : कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे वारे गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाहू लागले असून उबाठा गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का दिल्याचे चित्र आहे.
शिवसेनेतील बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली तर, काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणे पसंत केले. परंतु लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जसा जवळ येऊ लागला आहे, तसा उद्धव ठाकरे यांच्या गटातील पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना दिसू लागले आहेत. मुख्यमंत्री पुत्र व खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात अशीच काहीसे चित्र आहे. चार दिवसांपुर्वी डोंबिवलीतील उबाठा गटाचे शहर प्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या सेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ आता उबाठा गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासह केशव पाटील, शाखाप्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून शिंदेच्या सेनेकडून उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांची ठाण्यासाठी मोर्चेबांधणी
आमची मातोश्री ठाणेच – प्रकाश म्हात्रे
उबाठा गटाकडून आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही, आणि आपला भ्रमनिरास झाला आहे. गेल्या १० वर्षात कल्याण लोकसभेत विकासाची गंगा आली असून आपण आता विकासापासून अलिप्त राहू शकत नाही. शिवसेनेत ४० वर्ष काम करूनही मला मातोश्रीवर कुणी ओळखत नाही. बाळासाहेब हयात होते, तोपर्यंत आमची श्रद्धा होती, पण आता आमची मातोश्री ठाणेच आहे, अशी भावना यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे रमेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज
या सर्वांना उबाठा गटात मिळालेली वागणूक या सर्वाला कारणीभूत असून दुसरीकडे राज्य सरकार आणि शिवसेना यांचे काम उत्तम सुरू आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे एका विश्वासाने लोक शिवसेनेत येत आहेत, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.