कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या न घेता शहराच्या विविध भागात जाहिरातीचे फलक लावून शहर विद्रुप करणाऱ्या आस्थापना, व्यक्तिंवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कल्याण पश्चिमेतील क प्रभाग हद्दीत शहरातील वर्दळीच्या ठिकाणी बेकायदा फलक लावणाऱ्यांवर क प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी तीन अज्ञात व्यक्तिंविरुध्द गुन्हे दाखल केेले आहेत.
कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीत अनेक विकासक, आस्थापना, व्यावसायिक, राजकीय मंडळी, कार्यकर्ते आपल्या व्यवसायाच्या, वाढदिवसा शुभेच्छाच्या जाहिराती पालिकेच्या परवानग्या न घेता फलकांच्या माध्यमातून करतात. यासाठी पालिकेचे विद्युत खांब, रस्ता दुभाजक, चौक यांचा वापर करतात. या जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होते याचे भान जाहिराती करणाऱ्यांना नसते. पालिकेकडून सतत बेकायदा जाहिरात फलक काढण्याची मोहीम राबवुनही व्यावसायिक, राजकीय मंडळी शहरात फलक लावतात. त्यामुळे अशा जाहिरात फलक लावणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी प्रशासनाने संबंधितांवर गु्न्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
क प्रभाग हद्दीत आग्रा रस्ता, खडकपाडा, बेतुरकरपाडा, सहजानंदचौक, शक्ती चौक भागातील सुमारे १०० हून अधिक बेकायदा फलकांवर क प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत, अधीक्षक दापोडकर यांच्या पथकाने कारवाई केली. पालिकेची परवानगी न घेता शहराच्या मोक्याच्या ठिकाणी नियमबाह्य फलक लावून, शहराचे विद्रुपीकरण केल्या बद्दल साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी स्मार्ट बाईट काॅम्प्युटर, साम काॅम्प्युटर, यु टु केक या आस्थापनांचे फलक लावणाऱ्या अज्ञात व्यक्तिंवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले.
या आक्रमक कारवाईने फलक लावणाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ही माहिती मिळताच अनेक आस्थपनांनी स्वताहून काही ठिकाणचे आपले फलक काढून घेतले. अशाच प्रकारची कारवाई फ, ग, ड, जे, आय प्रभागात सुरू आहे. दररोज १० प्रभाग हद्दीतून सुमारे ८०० हून अधिक फलक काढले जात आहेत.
“ प्रभागात पालिकेची परवानगी न घेता बेकायदा फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. यापुढे फलकांवरील जाहिरातीमधील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधून संबंधित आस्थापना मालकाचे नाव शोधून त्या मालकावर गुन्हा दाखल करणार आहोत. तेव्हाच बेकायदा फलक लावण्याचे प्रकार थांबतील.” -संजयकुमार कुमावत, साहाय्यक आयुक्त ,क प्रभाग