कल्याण मधील नववर्ष स्वागत यात्रेत ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ ही संकल्पना घेऊन नववर्षाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवावर आधारित ४० चित्ररथ शोभायात्रेत सहभागी असतील, अशी माहिती कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष ॲड. निशिकांत बुधकर यांनी सोमवारी येथे दिली.कल्याण संस्कृती मंचतर्फे मागील २० वर्षापासून नववर्ष स्वागत यात्रा आयोजित केली जाते. गेल्या पाच वर्षापासून शहरातील प्रत्येक सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेला स्वागत यात्रेच्या यजमान पदाचा मान दिला जात आहे. यावर्षी रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणला हा मान मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>डोंबिवली जवळील २७ गावांमधील टँकर लाॅबीचे वर्चस्व मोडून काढा, टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा उद्योग मंत्र्यांचा इशारा

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात भारताने केलेली विविध क्षेत्रातील प्रगती, घेतलेली भरारी या अनुषंगाने स्वागत यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची महती सांगणारे चित्ररथ स्वागत यात्रेत असतील, असे बुधकर यांनी सांगितले.कल्याणमधील विविध क्षेत्रातील नागरिकांनी स्वागत यात्रेत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे अध्यक्ष डाॅ. सुश्रृत वैद्य यांनी केले आहे. स्वागत यात्रेतील संकल्पना आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रकल्प प्रमुख अर्चना सोमाणी (९८७०००९६५५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वैद्य यांनी केले आहे.

हेही वाचा >>>राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना तडीपारी संदर्भात नोटीस, एका आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश

गणेश पूजन करुन गुढी उभारुन सकाळी साडे सहा वाजता कल्याण पश्चिमेतील सिंडीगेट येथून स्वागत यात्रेला प्रारंभ होईल. आयुक्त बंगला, महावितरण कार्यालय, संतोषी माता रस्त्याने स्वागत यात्रा सहजानंद चौक, शिवाजी चौकशंकरराव चौक, अहिल्याबाई चौक, टिळक चौक, पारनाका, लाल चौकी येथून नमस्कार मंडळात यात्रेची सांगता होईल, असे संयोजक अध्यक्ष ॲड. बुधकर यांनी सांगितले.कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष निशिकांत बुधकर, कार्यवाह श्रीराम देशपांडे, कोषाध्यक्ष अतुल फडके, सल्लागार वसंतराव काणे, रोटरी क्लब न्यू कल्याणचे अध्यक्ष डाॅ. सुश्रृत वैद्य, बिजू उन्नीथन, सुखदा देशपांडे, निखिल बुधकर, अर्चना सोमाणी, यांच्या नियोजनाखाली स्वागत यात्रा पार पडणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan navvarsha swagat yatra swatantryaya amrit mahotsav amy