कल्याण : पुणे येथील स्वारगेट बस आगारातील महिलेवरील लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे आणि पथकाने पथसंंचलन केले. यावेळी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील बस आगार, आगारातील बसची तपासणी करण्यात आली.मागील अनेक वर्षापासून कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ले, लुटारू, मद्यपी यांचा उच्छाद होता. रात्री, दिवसा या भागात प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वाढले होते. उपायुक्त झेंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील मद्यपी, गुर्दुल्ले, लुटारू यांचे अड्डे उध्वस्त केले. त्यामुळे या भागातील गु्न्हेगारीवर अंकुश आला आहे.
स्वारगेट येथे एका प्रवासी महिलेवर एका इसमाने रात्रीच्या वेळेत लैंगिक अत्याचार केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, महात्मा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, इतर पोलीस अधिकारी, पोलीस पथके गुरुवारी रात्री कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात पथसंचलन करत दाखल झाली.पोलिसांनी कल्याण एस. टी. बस आगारात जाऊन तेथील उपस्थित अधिकाऱ्यांशी बस आगारातील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, रात्रपाळीच्या बस यांची माहिती घेतली. बस आगारातील प्रवाशांशी थेट सवांद साधला. काही पुरूष प्रवाशांची ओळखपत्रे तपासण्यात आली. रेल्वे स्थानक भागात काही कामे नसताना उडाणटप्पू करणाऱ्या टवाळांना रेल्वे स्थानक भागातून पिटाळून लावण्यात आले. रेल्वे स्थानक भागात पोलीस आल्याचे समजताच परिसरात रेंगाळणारे मद्यपी पसार झाले.
पोलिसांनी बस आगारातील, बस आगाराबाहेरील बसमध्ये जाऊन तपासणी केली. कल्याण रेल्वे स्थानक भागात कल्याण डोंबिवली पालिकेचे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी आणि बस आगाराबाहेरील बस थांब्यावर खासगी सुरक्षा रक्षक तैनात असतात. त्यांच्याशी पोलिसांनी संंवाद साधून प्रवासी सुरक्षेची माहिती घेतली. रेल्वे स्थानक भागातील रिक्षा चालकांना वाहनतळावर उभे राहून प्रवासी वाहतूक करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी केल्या. बस आगार, दीपक हाॅटेल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पालिकेने स्मार्ट सिटी कामासाठी काढून ठेवले आहेत. ते सीसीटीव्ही तातडीने बसविण्याच्या सूचना पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
कल्याण बस आगार, रेल्वे स्थानक भागातील रस्ते, अंतर्गत पोहच रस्त्यांवर पोलिसांकडून नियमित पथसंचलन केले जाते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही नियमित या भागात तपासणी करतो. रात्रीअपरात्री अनेक प्रवासी या भागातून प्रवास करतात. त्यामुळे या भागातील सुरक्षेचा आढावा स्थानिक प्रशासनाकडून घेतला. कल्याणजी घेटे साहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण.