कल्याण : येत्या काही दिवसातील गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती या सणांच्या काळात शहरात शांतता असावी. नागरिकांनी आनंद, उत्साहाने आपले सण साजरे करावेत, या विचारातून कल्याण शहरात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. सण, उत्सव काळात नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, असा संदेश या पथसंचलनाच्या माध्यमातून देण्यात आला. या पथसंचलनात स्थानिक पोलीस, राखीव दलाचे पोलीस, दंगल नियंत्रण पथकाचे पोलीस, गोपनीय शाखेचे, गुन्हे शाखेचे पोलीस असे एकूण शंभरहून अधिक पोलीस या पथसंचलनात सहभागी झाले होते.

महात्मा फुले पोलीस ठाणे येथून पथसंचलनाला सुरूवात करण्यात आली. सहजानंद चौक, काळी मस्जिद, शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील पालिका मुख्यालय, शंकरराव चौक, अत्रे नाट्यगृह, पारनाका, लालचौकी, दुर्गामाता चौक, दुर्गाडी मंदिर, वाय जंक्शन, दुर्गाडी किल्ला या मार्गावर पथसंचलन करण्यात आले. अशाच पध्दतीची पथसंचलने कल्याण पूर्व, डोंबिवली परिसरातील पोलीस ठाणे हद्दीत सुरू करण्यात आली आहेत.

आगामी सण, उत्सव विचारात घेऊन या उत्सवांच्या काळात शहरात शांतता राहावी. प्रत्येक नागरिकाने कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे. प्रत्येक नागरिकाला आपला सण, उत्सव आनंदाने साजरा करता यावा, या विचारातून शहरात ही पथसंचलन सुरू करण्यात आली आहेत. संवेदनशील भागात अशाप्रकारची पथसंचलने नियमित करण्यात येत आहेत. अतुल झेंडे उपायुक्त,कल्याण.