कल्याण : येथील चक्कीनाका भागातील एका बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या मुख्य सूत्रधार विशाल गवळी यांचा मोबाईल पोलिसांनी अधिकच्या माहितीसाठी फाॅरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविला आहे, अशी माहिती या प्रकरणातील एका तपास अधिकाऱ्याने दिली. विशाल गवळी आणि त्यांची पत्नी साक्षी कल्याण न्यायालयाच्या आदेशावरून चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. बालिकेची कल्याण पूर्वेतील आपल्या राहत्या घरी हत्या केल्यानंतर विशाल गवळी कल्याणमधून पळून गेला होता.

तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पळून गेला होता. तेथे त्याने आपला मोबाईल पाच हजार रूपयांना एका लाॅज मालकाला विकला होता. सुरुवातीला विशालने पोलिसांना आपण मोबाईल कसारा घाटात फेकून दिला आहे, अशी माहिती दिली होती. पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन जाऊन मोबाईल कोठे फेकून दिला याची माहिती काढण्याच्या तयारीत होते. आपण पोलिसांना तपासात खोटी माहिती दिली तर त्रास होईल या भीतीने विशालने नंतर आपली भूमिका बदलली. आपला मोबाईल आपण शेगाव येथील एका लाॅज मालक दीपक तायडे यांना पाच हजार रूपयांना विकला असल्याची माहिती दिली.

हेही वाचा…कल्याणमधील कचरा संकलनात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराचा ठेका रद्द, पालिकेकडून होणार ब, ड आणि जे प्रभागात सफाई

पोलिसांनी संबंधित लाॅज मालकाला संपर्क साधला. त्यांच्याकडून सीम कार्डसह मोबाईल ताब्यात घेतला. मोबाईलच्या माध्यमातून तो बालिकेची हत्या करण्यापूर्वी आणि नंतर कोणाकोणाच्या संपर्कात होता. त्याला या गुन्ह्यात अन्य कोणी मदत केली आहे का, याचा तपास पोलीस करणार आहेत. प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानंतर आणखी काही धागेदोरे पोलिसांंच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संध्याकाळी साडे पाच ते साडे सात वेळेत विशालने बालिकेची राहत्या घरात हत्या केली. या कालावधीत तो घरातच होता. त्याने या दोन तासाच्या अवधीत समाज माध्यमांवरील आपली माहिती सामायिक करण्याची खाती समाज माध्यमांवरून काढून टाकली होती. त्याने मोबाईलमधील विदा अशाच पध्दतीने काढून टाकल्याचा पोलिसांना संशय आहे. गु्न्ह्याच्या काळात विशालने एक बॅग वापरली होती. ही बॅग विशालने कल्याणमधील उल्हास खाडीत फेकून दिली होती. या पिशवीचा पोलिसांनी अग्निशमन, पाणबुड्यांच्या माध्यमातून खाडीत १२ किलोमीटर परिसरात शोध घेतला. बॅग आढळून आली नाही. तो मनोरुग्ण असल्याचे प्रमाणपत्र त्याच्याजवळ पोलिसांना आढळून आले नाही. तपास कामी आणि न्यायालयात भक्कम पुरावा उभा करण्यासाठी या सर्व गोष्टी महत्वाच्या असल्याने पोलिसांनी या तपासात एकही त्रृटी न ठेवण्याच्या खबरदारी घेतली आहे.

हेही वाचा…ठाणे-बोरिवली मार्गाच्या कामाला होणार जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा

पोलिसांकडून याप्रकरणी लवकरच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडणार आहेत. विशालला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी समाजमन आग्रही आहे.

Story img Loader