शहरांच्या चारही बाजूंनी विस्तारत गेलेल्या लोकवस्तीमुळे ग्रंथालय घरापासून लांब पडू लागले आहे. अशा वेळी ग्रंथालयातील एखादे पुस्तक घेण्यासाठी गेल्यानंतर तिथे ते पुस्तकच उपलब्ध नसेल तर वाचकाची घोर निराशा होते. त्याचबरोबर शहरातील ग्रंथालय वाचकांसाठी नेमके काय करते याचीही पुरेशी कल्पना सदस्यांना मिळत नसल्याने ग्रंथालय आणि वाचक यांच्यातील दरी अधिक रुंदावू लागली होती. हे टाळण्यासाठी ग्रंथालय आणि वाचक यांच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दरी साधण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने होत असून कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाने अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपच्या मदतीने वाचकांशी जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘सावाक’ असे या अ‍ॅपचे नाव असून वाचनालयाच्या संकेतस्थळावर ते उपलब्ध करून देण्यात आले आहे.  संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी पुढाकार घेऊन वाचनालयाचे अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेतला. नाशिक येथील युनिक्य कॉम्प्युटर या संस्थेच्या शेखर जोशी आणि अजित सम्पधरे यांनी ग्रंथालयाचे अ‍ॅप तयार केले. सध्या हे अ‍ॅप वाचनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून सभासदांना ते मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येते. हा अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यासाठी तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्या असून लवकरच तो प्ले स्टोअरवरसुद्धा उपलब्ध होऊ शकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अ‍ॅपची वैशिष्टय़े
* ग्रंथालयातील सुमारे ७० हजाराहून अधिक पुस्तकांचा शोध घेता येऊ शकतो.
* वाचनालयात दाखल झालेल्या नव्या पुस्तकांची यादी मिळेल.
* वाचनालयातील दुर्मीळ पुस्तकांची नोंद या अ‍ॅपवरून मिळू शकणार आहे.
* सभासदांच्या पुस्तकासाठी नोंदणी करण्याबरोबरच पुस्तकाची मुदत वाढण्यासाठी इथे सोय करण्यात आली आहे.

मोबाइल हा दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक असून वाचनालय या माध्यमातून वाचकांपर्यंत सहज पोहचू शकते. नव तंत्रज्ञानाच्या मदतीने हे सहज शक्य असल्याने ही कल्पना राबवण्यात आली आहे. सार्वजनिक वाचनालय कल्याणचे ‘सावाक’ हे अ‍ॅपच्या माध्यमातून सभासदांशी जोडणारे पहिले ग्रंथालय आहे.
– राजीव जोशी, अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय कल्याण.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan public library on mobile