लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण: अहमदाबाद-वसई-पुणे या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पिशव्यांमधून रात्रीच्या वेळेत किमती ऐवज चोरणाऱ्या चार जणांना कल्याण लोहमार्ग गु्न्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्यांच्याकडून पाच मोबाईलसह १० लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला.

रवी दशरथ गायकवाड (२८, रा.पुणे), गणेश सुरेश राठोड (२३, रा.पुणे), प्रकाश आश्रुबा नागरगोजे (२५, रा. पुणे), तानाजी शिवाजी शिंदे (२६, रा.संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी कर्जत, डोंबिवली, ठाणे, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत प्रवाशांचा ऐवज, मोबाईल चोरीचे गु्न्हे केले आहेत.

हेही वाचा… गृहनिर्माणप्रकल्पांना दिवाळखोरीचे ग्रहण; कल्याणमधील ७६ तर ठाणे मधील २४ प्रकल्पांचा समावेश

अहमदाबाद-वसई-पुणे या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पिशव्यांमधील सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम प्रवासी रात्रीच्या वेळेत झोपले की चोरीला जात होते. या विषयीच्या तक्रारी लोहमार्ग पोलीस ठाण्यात वाढल्या होत्या. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी सुरू केला होता. चोरीच्या घटना घडलेल्या रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलिसांनी काही चेहऱ्यांची ओळख पटवली होती.

हेही वाचा… ठाण्यात नवाकोरा रस्ता खोदला, पालिकेच्या नियोजन शुन्य कारभाराचे ठाणेकरांना दर्शन

तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यातून दशरथ गायकवाडला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीमधून इतर आरोपी पुणे, संभाजीनगर भागातून अटक करण्यात आले. या चौकडीने डोंबिवली, ठाणे, कल्याण, कर्जत रेल्वे परिसरात एकूण आठ गुन्हे केल्याची कबुली दिली. हे चारही जण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर बुलढाणा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांना न्यायालयाच्या आदेशावरुन पोलीस कोठडी ठेण्यात आले. या चोरट्यांकडून राज्याच्या विविध भागातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता तपास अधिकारी अरशुद्दीन शेख यांनी व्यक्त केली.

लोहमार्ग पोलीस आयुक्त डाॅ. रवींद्र शिसवे, उपायुक्त मनोज पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan railway police arrested the thief for stealing things from passengers in express dvr
Show comments