हैदराबाद ते मुंबई रेल्वे प्रवासात एक्सप्रेसमध्ये विसरलेली सोने, चांदीचे दागिने असलेली एका प्रवाशाची पिशवी गुजरातमधील अहमदाबादमध्ये वास्तव्य असलेल्या एका सह प्रवाशाने लबाडीने चोरुन नेली होती. कल्याण लोहमार्ग पोलीस, रेल्वे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने २४ तासात या इसमाचा शोध घेऊन दागिने मालक असलेल्या प्रवाशाला एक्सप्रेसमध्ये विसरलेली ४४ तोळे सोने, चांदीची पिशवी परत केली. या ऐवजाची किंमत २४ लाख रुपये आहे.
हेही वाचा >>> ठाणे : संजय राऊतांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडुण येऊन दाखवा; मंत्री शंभुराजे देसाई यांचे राऊतांना आव्हान
हैदराबाद-मुंबई दरम्यान एक्सप्रेसने प्रवास करताना एका प्रवासी कल्याण स्थानकात सोमवारी उतरला. उतरताना त्याची ४४ तोळे सोने, चांदीची पिशवी असलेली पिशवी एक्सप्रेसच्या सामानाच्या फडताळात राहिली. रेल्वे स्थानका बाहेर आल्यावर प्रवाशाला आपली ऐवजाची पिशवी एक्सप्रेसमध्ये राहिल्याचे लक्षात आले. तोपर्यंत एक्सप्रेसने कल्याण रेल्वे स्थानक सोडून दादरच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. या प्रवाशाने तातडीने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात येऊन घडला प्रकार सांगितला. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही माहिती रेल्वेचे विशेष तपास पथक, गु्न्हे शाखा पथक यांना ही माहिती दिली. दादर रेल्वे स्थानकात एक्सप्रेस थांबली. पोलिसांनी डब्यात जाऊन पाहिले त्यावेळी प्रवाशाची ऐवज असलेली पिशवी तेथे नव्हती. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण तपासले, त्यावेळी एक इसम प्रवाशाची पिशवी घेऊन जात असल्याचे दिसले. त्या इसमाची तांत्रिक माहितीच्या आधारे ओळख पटवली. तो अहमदाबाद मधील असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून प्रवाशाची विसरलेली ऐवजाची पिशवी ताब्यात घेतली. ही पिशवी संबंधित प्रवाशाला पोलिसांकडून परत करण्यात आली.