रेल्वे पोलिसांच्या ठाणे पथकाने नांदेडहून मुंबईत येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून एक कोटीची रोख रक्कम आणि नऊ लाख रूपये किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. एक्स्प्रेसमधून प्रवासी म्हणून प्रवास करत असलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
गणेश भगत, मयूर कापडी, नंदकुमार वैध, संजय मनिककामे, चंदू माकणे आरोपींची नावे आहेत. नांदेडहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या देवगिरी एक्स्प्रेसमधून काही प्रवासी एक कोटीची रक्कम आणि सोन्याची बिस्किटे अवैध पद्धतीने घेऊन जात आहेत, अशी माहिती ठाणे पोलिसांना मिळाली. रेल्वे गोपनीय विभागाचे निरीक्षक सुनील शर्मा, उपनिरीक्षक जी. एस. एडले, विजय पाटील, सुरक्षा बळाचे निरीक्षक प्रकाश यादव, तुकाराम आंधळे यांनी कल्याण रेल्वे स्थानकात सापळा लावला. देवगिरी एक्स्प्रेस स्थानकात येताच, संबंधित डब्यात पोलिसांनी प्रवेश केला. एका मोठ्या गठ्ठयामध्ये सोन्याची बिस्किटे आणि चार आरोपींजवळील बंदिस्त पिशव्यांमध्ये विभागून एक कोटी एक लाखाची रक्कम ठेवण्यात आली होती.
पोलिसांनी या गठ्ठे, पिशव्यांची विषयी आरोपींना विचारणा करताच त्यांची बोबडी वळली. समाधानकारक उत्तरे ते देऊ न शकल्याने त्यांना डब्यातून खाली उतरविण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपण कुरिअर कंपनीसाठी काम करतो. ताब्यातील कुरिअर पोहचविण्यासाठी मुंबईत जात असल्याची माहिती पोलिसांना दिली. एवढ्या मोठया प्रमाणात कुरिअरमधून रोख रक्कम पाठविण्यात येत असल्याने पोलिसांना संशय आला. आयकर विभागासह रेल्वे पोलिसांनी या तस्करीमागे कोणाचा हात आहे याचा तपास सुरू केला आहे.