मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवाशांचा मोबाइल चोरी होण्याच्या अनेक घटना घडत असतात. या चोरांना पकडण्यासाठी रेल्वे पोलीस कसोशीने प्रयत्न करत असतात. मध्ये रेल्वेच्या कल्याण स्थानकावर अशीच एक धक्कादायक आणि अचंबित करणाची घटना घडली आहे. एका प्रवाशाच्या मोबाइलमधील व्हिडिओमुळं मोबाइल चोर तर पकडला गेलाच, पण त्याशिवाय एका मृत्यूचं गूढ उकलण्यातही पोलिसांना यश मिळालं. झाहीद झैदी नामक प्रवाशी आपल्या मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. इतक्यात आकाश जाधव नामक चोराने त्याचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण झैदीने प्रसंगावधान दाखविल्यामुळे आकाशला मोबाइल घेऊन पळ काढता आला नाही.
असा पकडला गेला मोबाइल चोर
एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, झैदीचा मोबाइल चोरत असताना व्हिडिओ चित्रीकरण सुरू असल्यामुळे चोराचाही चेहरा त्यात रेकॉर्ड झाला. पोलिसांकडून सदर चोराला पकडण्यासाठी मदत मिळावी म्हणून झैदीने सदर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांची त्यावर नजर खिळली. त्या व्हिडिओत दिसणाऱ्या आकाश जाधवला कल्याण पोलिसांनी अटक केली.
आणि मृत्यूचंही गूढ उकललं
कल्याण रेल्वे पोलीस अधिकारी पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले की, मंगळवारी आम्ही चोराला अटक केली. त्याच्यावर याआधीही ठाण्यात काही गुन्हे दाखल होते. जाधवकडून आम्हाला आणखी एक मोबाइल मिळाला. हा मोबाइल कुठून मिळवला? असा प्रश्न पोलिसांनी विचारला असता जाधवला उत्तर देता आले नाही. मात्र मोबाइल स्विच ऑन केल्यानंतर सदर मोबाइल प्रभास भांगे नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समोर आले आणि इथेच एका मृत्यूचं गूढ उकललं.
प्रभास भांगे हे पुण्याचे रहिवासी असून बँकेचे कर्मचारी होते. होळीसाठी ते मुंबईत आले होते. २५ मार्चच्या रात्री विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ चालत्या ट्रेनमधून पडून त्यांचा मृत्यू झाला होता. जाधवला अटक करेपर्यंत भांगे यांच्या मृत्यूचे गूढ उकलले नव्हते. भांगे चालत्या ट्रेनमधून कसे काय पडले? असा प्रश्न पोलिसांनाही पडला होता. पण जाधवकडे त्यांचा मोबाइल मिळाल्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर आलं. जाधवने भांगे यांचा फोन हिसकावला आणि आपला फोन परत मिळविण्यासाठी भांगे धडपड करू लागले. या झटापटीतून ते ट्रेनखाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.
आकाश जाधवच्या अटकेमुळे मोबाइल चोरी आणि मृत्यूचेही प्रकरण अशाप्रकारे उलगडले गेले.