दोन महिन्यांत १२ हून अधिक कर्मचारी, अधिकाऱ्यांना लागण;
गर्भवती महिला कर्मचाऱ्याचा काविळीने मृत्यू
कल्याणपलीकडच्या १४ रेल्वे स्थानकांतील लाखो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याला काविळीच्या साथीने ग्रासले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये या ठाण्यात काम करणाऱ्या सव्वादोनशे कर्मचाऱ्यांपैकी १२ हून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना काविळीच्या आजाराने ग्रासले असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. या ठाण्यात कार्यरत असलेल्या एका गरोदर महिला कर्मचाऱ्यालाही कावीळची लागण झाली होती. या महिलेचा बाळंतपणाच्या काळात मृत्यू झाल्याने कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील कावीळची साथ उग्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहांची अस्वच्छता, स्वच्छतागृहांचे फुटलेले पाइप आणि पोलीस ठाण्याला होणारा दूषित पाणीपुरवठा यामुळे या साथीला बळ आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांना आता काविळीच्या साथीचा सामना करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात लोहमार्ग पोलीस ठाणे असून ब्रिटिश काळापासूनच ही इमारत अस्तित्वात आहे. जुनाट झालेल्या या इमारतीच्या आजूबाजूचा अस्वच्छ परिसर आणि इमारतीची दुर्दशा यामुळे हा भाग नेहमीच उकिरडय़ाच्या स्वरूपात आढळून येतो. पावसाळ्यामध्ये तर परिसराला गटाराचे स्वरूप येते. या शिवाय इमारतीमध्ये असणाऱ्या शौचालयाची पुरती दुर्दशा झाली असून त्यातून सांडपाण्याची गळती होत आहे. स्वच्छतागृहातील पाणी बाहेर येत असल्याने कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण होऊन बसले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थेच असली तरी यंदा मात्र याचा
परिणाम येथील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे.
गेल्या दोन महिन्यांमध्ये या पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना आरोग्याचा त्रास जाणवू लागला होता. प्रत्येकाने केलेल्या तपासणीमध्ये कावीळ या रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने येथील पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पोलीस ठाण्यात पूनम मनोहर कुंभार या महिला कर्मचाऱ्याला गरोदरपणामध्येच कावीळची लागण झाली. त्या गावी बाळंतपणासाठी गेल्या असता त्यांचा मृत्यू झाला. कावीळमुळेच प्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी कल्याण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही कावीळची लागण झाल्याचे सांगितले. येथील हवामान बदलामुळे हा आजार बळावला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
अस्वच्छतेमुळे पोलिसांचे आरोग्य धोक्यात..
पोलीस ठाण्यातील कोंदट आणि अस्वच्छ वातावरण, शौचालयाची दुरवस्था आणि प्रदूषित पाणीपुरवठा यामुळे हा त्रास वाढीस लागला असून प्रत्येक कर्मचारी आरोग्याच्या दृष्टीने सतर्क होऊन काम करत आहे. मात्र तरीही परिसरातील डास आणि मच्छरमुळे या ठाण्यात पाऊल टाकणेही कठीण होऊन बसले आहे. कल्याण रेल्वे पोलिसांच्या हद्दीत १४ स्थानके असून सुमारे सव्वादोनशेहून अधिक कर्मचारी या ठिकाणी काम करतात. या सगळ्यांना याचा त्रास होत असून रेल्वे प्रशासनाने या परिस्थितीमध्ये प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करून आवश्यक सोयी तात्काळ उपलब्ध करून देण्याची गरज कल्याण, कसारा, कर्जत प्रवासी संघटनेचे सचिव शाम ओबाळे यांनी व्यक्त केली आहे.