कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण होण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या मागणीवरून वाहतूक विभागाने येथील पश्चिमेतील रेल्वे स्थानक भागात वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये काही मार्ग एक दिशा तर काही मार्ग बंद केले जाणार आहेत, असे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी सांगितले. महात्मा फुले चौक, एस. टी. बस आगार ते वल्लीपीर रस्ता दरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी रेल्वे आरक्षण केंद्र ते सार्वजनिक स्वच्छता गृहापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाजी चौक, महम्मद अली चौक, पुष्कराज हाॅटेल ते दीपक हाॅटेल दरम्यानची वाहतूक एक दिशा करण्यात येणार आहे.
रेल्वे स्थानकाकडून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना दीपक हाॅटेल येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने महात्मा फुले चौक, दीपक हाॅटेल ते एस. टी. बस आगार ते गुरूदेव हाॅटेलमार्गे इच्छित स्थळी जातील. एस. टी. बस आगार, झुंझारराव मार्केट ते गुरूदेव हाॅटेल रस्ता एक दिशा मार्ग करण्यात येणार आहे. गुरूदेव हाॅटेलकडून कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना गुरूदेव हाॅटेल येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने शिवाजी चौक, पुष्पराज हाॅटेल, महमद अली चौक ते महात्मा फुले चौकातून इच्छित स्थळी जातील. झुंझारराव मार्केटमध्ये जाणारी वाहने डी मार्ट, आर्चिस गल्लीतून धावतील.
हेही वाचा : दाट धुक्यामुळे रेल्वे रखडली
आर्चिस गॅलरी, साधना हाॅटेल, ते टेनिस कोर्ट रस्ता एक दिशा करण्यात येत आहे. ही वाहने दीपक हाॅटेल, बस आगार, गुरूदेव हाॅटेलकडून इच्छित स्थळी जातील. मुरबाड रस्त्याने फुले चौकातून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनाना फुले चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने दीपक हाॅटेल, बस आगार ते गुरूदेव हाॅटेलमार्गे इच्छित स्थळी जातील.
हेही वाचा : ठाणे : रेव्ह पार्टी प्रकरणी कासारवडवली पोलिसांची चौकशी
महात्मा फुले चौक ते दीपक हाॅटेल हा यापूर्वीचा एक दिशा मार्ग रद्द करून तेथे दुहेरी वाहतूक सुरू केली जाणार आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना सुभाष चौक येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. अवजड वाहने प्रेम ऑटो चौकातून इच्छित स्थळी जातील. खासगी बस फुले चौक येथे वळण घेऊन सुभाष चौकमार्गे जातील. महात्मा फुले चौक ते वल्लीपीर रस्ता दरम्यानच्या उड्डाण पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत ही वाहतूक अधिसूचना अंमलात राहणार आहे, असे वाहतूक अधिकाऱी बने यांनी सांगितले.