कल्याण- कल्याण रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी एका महिला प्रवाशाच्या बटव्यातील मोबाईल भुरट्या चोराने लंपास केला. कल्याण रेल्वे स्थानकातील मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे प्रवासी हैराण आहेत. रेल्वे स्थानकात चारही बाजुने सीसीटीव्ही कॅमेर असतानाही भुरटे रेल्वे स्थानकात येण्याचे धाडस करतात कसे असे प्रश्न प्रवासी करत आहेत.

डोंबिवलीत राहणाऱ्या वसुधा पत्की या कल्याण पूर्वेतील एका शाळेत मुख्याध्यापिका आहेत. सोमवारी सकाळी त्या शाळेत जाण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकातून कल्याणला गेल्या. कल्याण रेल्वे स्थानकात उतरून जिन्याने कल्याण पूर्व भागात जात असताना त्यांना आपल्या बटव्यातील मोबाईल गायब झाल्याचे निदर्शनास आले. लोकलमध्ये बटवा हातामध्ये अडकविला असल्याने त्याचा काही भाग पाठीमागे होता. त्यावेळेस भुरट्या चोराने पाळत ठेऊन मुख्याध्यापिका पत्की यांची नजर चुकवून मोबाईल लांबविला.

शिक्षण विभागाचे सर्व अध्यादेश, शाळेची माहिती, विद्यार्थ्यांचे उपक्रम, शिक्षकांचे संपर्क क्रमांक मोबाईलमध्ये होते. मोबाईल हरविल्याने मुख्याध्यापिका पत्की यांनी मुलगा भूषण पत्की यांना संपर्क करून घडल्या प्रकाराची माहिती दिली. शाळेत उपस्थिती लावल्यानंतर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन मुख्याध्यापिका वसुधा पत्की यांनी तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

दर आठवड्याला कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांकडून मोबाईल चोरीच्या पाच ते सहा घटना घडतात. मोबाईल महिला, पुरूष चोरांची एक टोळी कल्याण रेल्वे स्थानकात कार्यरत आहे, असे सांगण्यात येते. काही मोबाईल चोर पकडण्यात आले आहेत. त्यांची जागा तात्काळ दुसरे भुरटे चोर घेतात, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader