कल्याण – कल्याण रेल्वे स्थानक प्रशासनाने कल्याण डोंबिवली पालिकेची पाणी देयकाची चार कोटी ४१ लाखाची थकबाकी वारंवार नोटिसा पाठवूनही पालिका तिजोरीत भरणा केली नाही म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेच्या जे प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी कल्याण रेल्वे स्थानकाला होणारा पाणी पुरवठा वरिष्ठांच्या आदेशावरून शनिवारी संध्याकाळी खंडित केला होता. यामुळे रेल्वे स्थानक, रेल्वे रुग्णालय, कर्मचारी महासंघ, मोटारमन निवास कार्यालयांमध्ये पाण्याचा ठणठणाट होता.
पालिकेच्या या कारवाईने रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली. कल्याण रेल्वे स्थानकात दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यात कडक उन्हाळ्याचे दिवस. रेल्वे स्थानकांवर पाणी नसेल तर प्रवाशांकडून उद्रेक होण्याची भीती रेल्वे अधिकाऱ्यांना वाटली. ज्या मालमत्ताधारकांमध्ये मालमत्ता कर, पाणी देयकाची थकित रक्कम आहे. त्यांच्या सुविधेसाठी पालिका मालमत्ता कर विभागाने ३१ मार्चपर्यंत अभय योजना लागू केली आहे. या योजनेतून थकबाकीदारांना थकित रकमेचा भरणा केला तर काही रकमेवर सूट मिळत आहे. ही योजना राबवुनही रेल्वे प्रशासनाने त्यांच्याकडील पाणी देयकाची चार कोटी ४१ लाखाची रक्कम भरणा न केल्याने जे प्रभागाचे साहाय्यक आयुक्त तामखेडे यांनी शनिवारी संध्याकाळी कल्याण रेल्वे स्थानकाला होणारा पाणी पुरवठा खंडित केला.
कल्याण रेल्वे स्थानकाला होणारा पाणी पुरवठा पालिकेने खंडित केल्याची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांची पळापळ झाली. रेल्वेच्या वरिष्ठांना ही माहिती देण्यात आली. खंडित पाणी पुरवठ्याचा रेल्वे स्थानकासह रेल्वेच्या इतर आस्थापनांना फटका बसला. जोपर्यंत थकित रक्कम भरणा केली जात नाही तोपर्यंत पाणी पुरवठा सुरू केला जाणार नाही, अशी तंबी रेल्वे प्रशासनाला पालिकेकडून देण्यात आली होती. रेल्वे स्थानकावर पाणी नसेल तर हाहाकार माजेल म्हणून रेल्वे प्रशासनाने थकित पाणी पुरवठा रकमेतील एक कोटी १७ लाख रूपये भरण्याची तयारी सुरू केली. उरलेली रक्कम लवकरच भरण्यात येईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाला दिले. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणी पुरवठा रविवारी संध्याकाळी २२ तासानंतर पूर्ववत करण्यात आला. तोपर्यंत रेल्वे प्रशासनाने टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू करून रेल्वे स्थानकाला पाणी टंचाई जाणवणार अशी व्यवस्था केली होती. “येत्या आठवड्यात रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर उर्वरित थकित रक्कम भरण्यासंदर्भात बैठक होणार आहे”, असे साहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी सांगितले.