कल्याण : गावात कोणाही सरपंचाने चुटुकफुटूक काम केले तरी ते काम मीच केले म्हणून तेथे फलक लावणारे खासदार तसेच निवडणुकांपूर्वी नवी मुंबई लगतच्या १४ गावांच्या विकासासाठी आणाभाका घेणारे, सर्वांगिण विकासाच्या घोषणा करणारे नगरविकासाचे प्रमुख, ठाण्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता वाऱ्यावर असलेल्या १४ गावांच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा. निवडणुका आल्या की १४ गावांचा खेळ करण्याचे प्रकार बंद करा, अशी बोचरी टीका कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर समाज माध्यमांतून केली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईचे सर्वेसर्वा व तोवनमंत्री गणेश नाईक यांनी १४ गावे नवी मुंबई पालिकेतून वगळण्याची मागणी केली आहे. ही गावे शिंदे पिता-पुत्रांनी नवी मुंबईत घेतले जातातण्याची घाईघाई लोकसभा निवडणूक काळात केली. आता राज्याच्या अर्थसंकल्पात या गावांसाठी एक पैशाची तरतूद नाही. मग या गावांचा भार नवी मुंबई पालिकेने का घ्यायचा, असाच प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे गणेश नाईक यांनी १४ गावे पालिकेतून वगळण्याची मागणी केली असेल तर त्यात चूक काय, असा प्रश्न माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे.
नवी मुंबईचे तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी १४ गावांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी पाच हजार ९०० कोटी, गावांच्या विकासासाठी ५९१ कोटीची मागणीचा आराखडा तयार केला होता. या गावांमधील अतिक्रमणे काढली की गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार होता. ही गावे नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्यासाठी जी तत्परता शिंदे पिता पुत्रांनी दाखवली, ती तत्परता या गावांना विकास निधी मिळविण्यासाठी का नाही दाखवली, असा प्रश्न करत राजू पाटील यांनी, निवडणुकीपुरता या गावांचा जुमला केला. निवडणुकीच्या काळात वाद नको म्हणून आपण या विषयावर काही बोललो नाही. हा विषय पुढे ढकलला, असे गणेश नाईक म्हणत असतील तर १४ गावांचा ठरवून खेळ करण्यात आला आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. निवडणूक, राजकारणापुरता आगरी समाजाचा वापर करणे आता टाळावे, अशी सूचना राजू पाटील यांनी शिंदे पिता पुत्रांना केली आहे.
आडिवली भुतवली भागातून नवी मुंबईला जाणारा प्रशस्त रस्ता, या भागातून एक भागातून बोगदा तयार करण्यात आला तर ठाणे, डोंबिवली परिसर थेट नवी मुंबईशी जोडला जाणार आहे. ही कामे ही मंडळी हाती घेणार नाहीत. कारण या मंडळींच्या कच्च्याबच्च्यांची गोदामे या भागात आहेत. या गोदांना याच लोकांचा वरदहस्त आहे. अद्याप भूक भागली नाही म्हणून अनावश्यक उद्योग सुरू आहेत. ओरबडून घ्यायची वृत्ती यांनी आता सोडून द्यावी. गणेश नाईक यांचे नवी मुंबई शहरावर प्रेम आहे. वीस वर्ष त्यांनी तेथे कर वाढविला नाही. या शहरावर विकासापासून दूर असलेली गावे शिंदे पिता पुत्रांनी समाविष्ट करून पालिकेवरील भार वाढविला आहे. या गावांच्या सर्वांगिण विकासासाठी शिंदे पिता पुत्रांनी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. १४ गावांच्या पाठीशी मनसे ठाम आहे, अशी ठाम भूमिका राजू पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत व्यक्त केली आहे.