Kalyan Rape-Murder case: कल्याण येथील चक्कीनाका भागातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल गवळीने यापूर्वीही विनयभंगासारखे गुन्हे केले होते. पण मानसिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र दाखवून यापूर्वी दोन वेळा न्यायालयातून जामीन मिळवल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. हत्या केल्यानंतर विशाल बुलढाणा येथे पळून गेला होता. गुरुवारी सकाळी त्याला ठाणे येथे गुन्हे शाखेच्या पथकाने ठाण्यात आणले. त्याला नौपाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने विशालला पत्नीसह दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे.
भाजपाचे आमदार आरोपीला सोडवत होते
शिवसेना (शिंदे) पक्षाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “कल्याण बलात्कार-खून प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याचे कुटुंबिय भाजपाचे काम करत होते. आरोपी विशाल गवळी भाजपामध्ये सक्रिय होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असतानाही भाजपाचे माजी आमदार त्याला सोडवत असत. त्यामुळेच त्याला कोणतेही भय उरले नव्हते. त्याला सोडविले गेले नसते, तर आज त्या मुलीवर ही वेळ आली नसती. आरोपीचे एन्काऊंटर किंवा फाशीची शिक्षा होईल की नाही? याची शाश्वती नाही.”
हे वाचा >> विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या, पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
“आरोपी विशाल गवळीचे एन्काऊंटर किंवा त्याला फाशीची शिक्षा झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू. माझ्यावर भर पोलीस ठाण्यात गोळीबार झाला अजूनही आरोपी फरार आहेत. भाजपाने गुंडशाही वाढवण्याचे काम केले”, असाही आरोप महेश गायकवाड यांनी केला.
कल्याणमध्ये पोलिसांची संख्या कमी असून इथे पोलीस फौजफाटा कमी आहे. गुन्ह्याचे तपास वेगात होत नाही. गुन्हेगारांना आसरा देण्याचे काम भाजपाकडूनच केले जाते, असाही आरोप गायकवाड यांनी केला.
कल्याणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला
या घटनेचा निषेध नोंदवत कल्याणमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळीदेखील महेश गायकवाड यांनी अशीच मागणी केली होती. बदलापूरच्या आरोपीचे जसे एन्काऊंटर केले तसे एन्काऊंटर विशाल गवळीचे केले जावे, अशी अपेक्षा आहे. सदर आरोपीवर आधीही गुन्हे दाखल झाले आहेत.
भाजपाने आरोप फेटाळले
महेश गायकवाड यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. विशाल गवळी याचा भाजपशी काडीचाही संबंध नाही. तो भाजपाचा साधा किंवा सक्रिय सदस्य नाही. सक्रिय सदस्य होण्यासाठी भाजपामध्ये एक मोठी प्रक्रिया आहे. विशालने निवडणुकीत कोणाचे काम केले किंवा केले नाही याचा भाजपाशी काही संबंध नाही. विशाल गवळी याचे फेसबुक पेज पाहिले तर तर तो कोणाचा समर्थक आहे, हे छायाचित्रावरून स्पष्ट होते, असे स्पष्टीकरण भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी दिले.