कल्याण : कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रातील रिक्षा चालक प्रस्तावित भाड्यापेक्षा जादा भाडे आकारत असतील, प्रवाशांशी उध्दट वागत असतील तर अशा रिक्षा चालकांच्या तक्रारी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कल्याण कार्यालयाने प्रवाशांसाठी ९४२३४४८८२४ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील काही रिक्षा चालक मनमानी करून प्रवाशांकडून प्रस्तावित भाड्यापेक्षा अधिकचे भाडे आकारत आहेत. काही रिक्षा चालक जवळचे भाडे नाकारत आहेत. प्रवाशांशी भाडे घेण्यावरून वाद घालत आहेत. काही रिक्षा चालक एका रिक्षेत तीन प्रवासी घेऊन जाण्यास मुभा असताना काही रिक्षा चालक मागील आसनावर तीन आणि चालकाच्या दोन्ही बाजुला दोन अशा पध्दतीने प्रवासी बसवून शेअर पध्दतीने प्रवासी वाहतूक करत आहेत. या पध्दतीमुळे प्रवाशांनाही त्रास होत आहे. अशाप्रकारच्या अनेक तक्रारी मागील काही महिन्यांपासून कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कल्याण कार्यालयाकडे प्रवाशांकडून येत आहेत.

या तक्रारींचे तात्काळ निराकरण करता यावे, प्रवाशांना बसल्या जागी रिक्षा चालकांची तक्रार आरटीओ अधिकाऱ्यांना करता यावी या उद्देशातून कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुळ यांनी ९४२३४४८८२४ हा विशेष सुविधा क्रमांक प्रवाशांना उपलब्ध करून दिला आहे.

काही रिक्षा चालक वाहनतळ सोडून रेल्वे प्रवेशद्वारासमोर रिक्षा उभ्या करून बेकायदा प्रवासी वाहतूक करत आहेत. बहुतांशी रिक्षा चालक आरटीओच्या नियमा्प्रमाणे सफेद, खाकी गणवेश परिधान करत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. डोंबिवलीत गेल्या काही दिवसापूर्वी पूर्व भागातील भगतसिंग रस्त्यावर काँक्रीटचे काम करण्यात आले. या कामासाठी रिक्षा चालकांना चार रस्त्यावरून वळसा घेऊन दावडी, रिजन्सी, गोळवली भागात जावे लागत होते. या वळशामुळे रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून वाढीव पाच ते दहा रूपये आकारण्यास सुरूवात केली. आता रस्ता सुरळीत सुरू झाला आहे. तरी रिक्षा चालकांनी वाढविलेली भाडेवाढ अद्याप कमी केलेली नाही, अशा तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी याप्रकरणाकडे लक्ष घालण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन वेळा डोंबिवली, कल्याण परिसरातील रिक्षा चालकांची अचानक तपासणी करावी. यामुळे बेशिस्त रिक्षा चालकांना अंकुश लागेल. वाहनतळावर तासनतास उभे राहून प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रामाणिक रिक्षा चालकांवरअन्याय होणार नाही, अशी मागणी प्रवाशांची आहे.

रिक्षा चालकांसंदर्भात प्रवाशांची काही तक्रार असेल तर ती प्रवाशांना आहे त्या घटनास्थळावरून करता यावी यासाठी प्रवाशांच्या सुविधेसाठी एक विशेष सुविधा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुविधा क्रमांकावरून प्रवाशांनी रिक्षा चालकासंदर्भात काही तक्रार केली तर त्याची गंभीर दखल आरटीओ कार्यालयाकडून घेतली जाणार आहे. आशुतोष बारकुळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,