लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण: कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील काळू, बारवी, उल्हास नद्यांना पूर आला आहे. या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. या नद्यांचे पाणी परिसरातील गावांमध्ये घुसले आहे. गावांना जोडणारे अंतर्गत पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटून दळणवळण पूर्ण बंद झाले आहे.

सर्वाधिक वाहन वर्दळीच्या कल्याण-मुरबाड रस्त्यावरील रायते येथील उड्डाण पूल पुराच्या पाण्याखाली गेल्याने कल्याण-अहमदनगर मार्गावरील रस्ते वाहतूक बंद झाली आहे. अनेक वाहन चालकांनी माघारी परतून शहापूर, सरळगावमार्गे तर काहींनी नाशिकमार्गे अहमदनगरकडे जाण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा-डोंबिवली-कल्याण जलमय

कल्याण तालुक्यातून वाहत असलेल्या नद्यांचे पात्र सखल आहे. या नद्यांना गाव परिसरातून वाहत येणारे ओहोळ, डोंगर माथ्यावरुन येणाऱ्या ओहळ्या येऊन मिळतात. एकाच वेळी हे पाणी नद्यांच्या दिशेने वाहते. त्यामुळे गाव परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आपटी, चोण, रायते गावांचा गावातील अंतर्गत पुलांवरुन पाणी वाहत असल्याने गावांचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे. या भागातील वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे.

आपटी रस्त्यावरील मोरीवर पुराचे पाणी आल्याने अम्मू रिसॉर्ट परिसर जलमय झाला आहे. आपटी भागात येजा करणारी वाहने या मोरीच्या दोन्ही बाजुला रखडली आहेत. कल्याण-नगर महामार्गावरील रायते गावा जवळील उल्हास नदी दुथडी वाहत आहे. या नदीवरील रायते पांजरपोळ येथील पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. टिटवाळ्या जवळील काळू नदी दुथडी भरुन वाहत आहे. नदी काठच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या आहेत.

आणखी वाचा-मुंबई-नाशिक महामार्गावरील अपघातप्रवण खडवली फाटा येथे उड्डाण पुलाची मागणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

वालधुनी, उल्हास नदीचे पाणी म्हारळ, कांबा, वरप परिसरात घुसले आहे. त्यामुळे या भागातील ९० कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. म्हारळ, कांबा परिसरात बांधण्यात आलेल्या कल्याण-नगर रस्त्याची उंची तीन फूट उंच वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या गावांच्या हद्दीतून वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याला अनेक ठिकाणी अडथळे आले आहेत. बडोदा-मुंबई, समृध्दी महामार्ग कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातून जात आहेत. या रस्ते बांधकामांमुळे अनेक ठिकाणी नैसर्गिक प्रवाह बंद झाले आहेत. वळण घेऊन हे पाणी इतस्ता पसरते. त्यामुळे ग्रामीण भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसू लागला आहे, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक ठप्प होऊ लागल्याने बहुतांशी शाळांनी मुलांची गैरसोय टाळण्यासाठी दुपारनंतर शाळा सोडून देणे पसंत केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan rural area hit by flood kalyan nagar road closed due to water on raite bridge mrj