5.5 Crore seize in Kalyan:: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिळफाटा येथे शनिवारी एका वाहनातून निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने पाच कोटी ५५ लाखची रक्कम जप्त केली. ही रक्कम १० लाखापेक्षा अधिक असल्याने ही रक्कम प्राप्तिकर विभागाकडे अधिकच्या चौकशीसाठी दिली आहे, अशी माहिती कल्याण ग्रामीण विधानसभा विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी माध्यमांना दिली.

शिळफाटा परिसरात स्थिर सर्वेक्षण विभागाचे एक पथक कार्यरत आहे. हे पथक शनिवारी सकाळी संशयास्पद वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी त्यांना एका वाहनाची तपासणी करत असताना त्या वाहनात मोठ्या प्रमाणात रक्कम आढळली. या रकमेची मोजणी केल्यावर ही रक्कम पाच कोटी ५५ लाख आढळली. पथकाने ते वाहन बाजुला घेतले. या रकमेबाबत काही अधिकृत कागदपत्रे आपणासोबत आहेत का अशी विचारणा वाहनातील व्यक्तिंना केली. या रकमेबाबत वाहनातील व्यक्ति कोणतीही माहिती निवडणूक पथकाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे पथकाने ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांना कळवली.

हेही वाचा : मविआ सरकारमुळे राज्याला आजही दुष्परिणाम भोगावे लागताहेत, केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांची टिका

ही रक्कम संशयास्पद असल्याने ही माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. पंचांसमक्ष या रकमेचा पंचनामा करून ही रक्कम प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी अधिकच्या चौकशीसाठी ताब्यात घेतली. निवडणुकीचा अंतीम टप्पा सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात उलाढाली होण्याची शक्यता विचारत घेऊन निवडणूक पथकांनी जोरदार वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे.