मध्य अशियातील येमेनमध्ये हंसा बंडखोरांनी एक मालवाहू जहाजाचे अपहरण केले होते. यात कल्याणमधील गोविंदवाडीमध्ये राहणाऱ्या एका तरूणाचाही समावेश होता. मागील साडेतीन महिन्यांपासून या जहाजावरील अधिकारी, कर्मचारी हंसा बंडखोरांच्या ताब्यात होते. अखेर भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे हा तरूण साडेतीन महिन्यांनी आपल्या कल्याणमधील घरी सुखरूप परतला. अपहरण झालेल्या कल्याणमधील या तरुण कर्मचाऱ्याचं नाव मोहम्मद मुन्नवर (४०) असं आहे.
येमेनमधून सुखरुप सुटका झाल्यानंतर मोहम्मद मुन्नवर म्हणाले, “रमझान महिन्याच्या पवित्र सणात घरी आल्याने खूप समाधानी, आनंदी आहोत. रमझान ईद कुटुंबीयांबरोबर साजरी करण्यास मिळणार आहे. हा आनंद सर्वाधिक आहे. जहाजावर साडेतीन महिने बंडखोरांच्या नजरकैदेत अतिशय खडतर परिस्थितीत काढले. बाहेरच्या जगाशी अजिबात संपर्क नव्हता.”
“अपहरण झाल्याचे कळल्यापासून आई, बहिण खूप काळजीत होते. मी घरी सुखरूप येवो यासाठी आई बेनझिर, बहिण अलिया यांचा धावा सुरू होता. यानंतर आईने भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क करून सुटकेसाठी खूप पाठपुरावा केला. मोदी सरकारने अपहरणाची दखल घेऊन सुटकेसाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. बंडखोरांकडून विविध प्रकारच्या मागण्या सरकारकडे केल्या जात होत्या. अतिशय मुत्सद्दीपणाने भारत दुतावासातील अधिकाऱ्यांनी बंडखोरांशी चर्चा करून माझी सुटका केली,” अशी माहिती मोहम्मद मुन्नवर यांनी दिली.
मालवाहू जहाज अपहरण
मोहम्मद येमेनमधील खलिद फरज शिपींग कंपनीच्या मालवाहू जहाजावर डॉक कर्मचारी म्हणून काम करतो. येमेन देशाचा संयुक्त अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्या बरोबर अनेक वर्षांचा सुप्त संघर्ष सुरू आहे. या संघर्षातून येमेनमधील समुद्राजवळ हंसा बंडखोरांनी खलिद फरज कंपनीच्या मालवाहू जहाजाचे साडेतीन महिन्यापूर्वी अपहरण केले.
स्थानिक सरकारे जहाज, त्यावरील कर्मचाऱ्यांच्या सोडवणुकीसाठी अनेक पातळ्यांवर बंडखोरांशी चर्चा करत होते. जहाजावरील एकाही कर्मचाऱ्याच्या जीविताला धोका होणार नाही याची काळजी प्रत्येक सरकारकडून घेतली जात होती, असे मोहम्मद यांनी सांगितले.
हेही वाचा : ठाण्यात ७३ अतिधोकादायक तर १७० धोकादायक इमारती? कोकण विभागीय आयुक्तांच्या बैठकीत यादी जारी
भारतीय दुतावासाने आपली सुटका व्हावी म्हणून बंडखोरांशी चर्चा सुरू ठेवली होती. विविध मागण्या केल्या जात होत्या. मुत्सद्दीपणाने भारतीय दूत बंडखोरांशी चर्चा करत होते. अखेर या चर्चेतून दूतावासामधील अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या कौशल्यपूर्ण चर्चेमुळे आपली सुटका झाली. मोदी सरकारचा यात महत्वाचा वाटा आहे. आपण एक सामान्य महिला असूनही दुतावासाकडून घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती आणि मुलाच्या सुखरुपतेची माहिती दिली जात होती, अशी माहिती महम्मद मुन्नवर यांच्या आई बेनझिर यांनी दिली. मोहम्मद घरी आल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे.