किशोर कोकणे, लोकसत्ता
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अतिशय वर्दळीचा आणि वाहतूक कोंडीमुळे चर्चेचा ठरलेला शिळफाटा-कल्याण-भिवंडी मार्गाच्या काँक्रीटीकरण, रुंदीकरणाचे काम येत्या पावसाळय़ापूर्वी पूर्ण होईल अशा पद्धतीने नियोजन केले जात आहे. एकूण २१.०९ किलोमीटर मार्गिकेच्या या रस्त्यावरील पाच किलोमीटरचा रस्ता तयार करणे शिल्लक असून पुढील तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) केला जात आहे.
उरण जेएनपीटीहून भिवंडी, गुजरातच्या दिशेने हजारो अवजड वाहनांची वाहतूक कल्याण- शिळफाटा मार्गावरून होत असते. शिळफाटा भागात गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. येथील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीसाठी पुरेशी सुविधा नसल्याने अनेकजण त्यांच्या खासगी वाहनाने नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई गाठत असतात. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा मोठा भार येत आहे. वाहनांच्या तुलनेत येथील रस्ता अत्यंत अरुंद असून रस्त्या कडेला मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे आहेत. तसेच रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली आहे. पावसाळय़ात या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागत असतात. त्यामुळे हा रस्ता काँक्रीटीकरण करण्याचा तसेच रुंदीकरणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. २०१८ मध्ये या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानुसार, शिळफाटा ते कल्याण आणि भिवंडीतील रांजणोली असा २१ किलोमीटर लांब रस्त्याच्या रुंदीकरणास एमएसआरडीसीने सुरुवात केली होती. मात्र, या दुरुस्ती कामांमुळे रस्ता आणखी अरुंद झाल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडीत भर पडली आहे. मात्र, आता या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचा दावा एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. सध्या पलावा ते काटई हा सुमारे एक किलोमीटर मार्ग तसेच कल्याण येथील दुर्गाडी परिसरात चार किलोमीटपर्यंतचा रस्ता तयार करण्याचे काम शिल्लक आहे. रस्ता तयार झाल्यानंतर येथे बस थांबे बसविणे, रस्त्याकडेला सुशोभिकरण, दुभाजक बसविणे अशी कामे केली जाणार आहेत. येत्या तीन महिन्यांत ही कामे पूर्ण होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या एका अभियंत्याने दिली. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी हा रस्ता वाहन चालकांना उपलब्ध होणार असून पावसाळय़ात होणाऱ्या कोंडीतून चालकांची सुटका होण्याची शक्यता आहे.