कल्याण : कल्याण-शिळफाटा रस्त्यावर मानपाडा हद्दीतील रुणवाल चौक येथे नवी मुंबई पालिका परिवहन सेवेच्या बसला गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता अचानक आग लागली. आग लागताच चालकाने प्रवाशांना उतरण्याचा इशारा केला. याठिकाणी गस्तीवर असलेल्या कोळसेवाडी शाखेच्या वाहतूक पोलिसांनी तातडीने बसमधील २२ प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. या आगीत जीवित हानी झाली नाही, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बसला आग लागताच रस्त्याच्या दुतर्फाची वाहतूक वाहतूक पोलिसांनी रोखून धरली. त्यामुळे सकाळी काही वेळ शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. नवी मुंबई पालिका परिवहन सेवेची बस गुरुवारी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान कल्याण दिशेने २२ प्रवासी घेऊन चालली होती. शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा हद्दीतील रुणवाल चौक भागात बस येताच अचानक बसमधून धूर येऊन बसला आग लागली. चालकाने तत्परतेने प्रवाशांना बसमधून उतरण्याचे आवाहन केले. ते स्वता बसमधून उडी मारून बाजुला झाले.

हेही वाचा…हवा प्रदुषण रोखण्यासाठी पाहाणीबरोबरच दंडात्मक कारवाई, नोटीसीनंतर नियमांचे पालन होते की नाही, याची पाहाणी सुरू

या भागात सकाळच्या वेळेत कोळसेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियोजनासाठी तैनात होते. बसला आग लागताच गस्तीवरील वाहतूक पोलिसांनी पहिले इतर अनर्थकारी घटना टाळण्यासाठी दोन्ही बाजुची वाहतूक रोखून धरली. तातडीने एक टँकर घटनास्थळी बोलावून घेतला. टँकरमधील पाण्याच्या साहाय्याने कोळसेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक डुकळे, हवालदार बोरकर, नाईक, प्रधान, वाहतूक सेवक जयवंत भोईर यांनी वाहतूक नियोजना बरोबर बसला लागलेली आग विझविण्यात महत्वाची भूमिका बजावली.

बसची आग अर्धा तासात विझवल्यावर तातडीने एक क्रेन घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी बोलवली. या क्रेनच्या साहाय्याने आगीत जळून खाक झालेली बस रस्त्याच्या बाजुला घेऊन या रस्त्यावरची वाहतूक सुरळीत करण्यात आली. आग लागली त्यावेळी या भागातून ज्वलनशील घटक घेऊन जाणारे ट्रक, टॅन्कर धावत असतात. त्यामुळे पोलिसांनी इतर काही दुर्घटना यावेळी होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली होती. सकाळच्या वाहन वर्दळीच्या वेळेत बस पेटण्याची घटना घडल्याने या रस्त्यावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. या बसमधील प्रवासी खासगी वाहने, रिक्षेने इच्छित स्थळी निघून गेले.

हेही वाचा…उल्हासनगरच्या आयुक्तांची उपमुख्यमंत्र्यांच्या उपसचिवपदी नियुक्ती विकास ढाकणेंची अल्पावधीत बदली, नव्या आयुक्तपदी डॉ. रसाळांचे नाव चर्चेत

शिळफाटा रस्त्यावर गुरुवारी सकाळी नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसला आग लागली. या बसमधील प्रवासी गस्तीवरील वाहतूक पोलिसांनी सुरक्षितपणे बाहेर काढून बसला लागलेली आग विझविण्यात महत्वाची भूमिका बजावली. या रस्त्यावरील वाहतूक आता सुरळीत करण्यात आली आहे. पंकज शिरसाट पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग.