‘एमएसआरडीसी’चे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांची माहिती
भिवंडी बाह्यवळण रस्ता-कल्याण ते शीळफाटा या २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. या रस्त्याचे कोन-भिवंडी बाजूकडील एक किमीचे आणि डोंबिवली, २७ गाव बाजूकडील तीन ते चार किमी लांबीचे काम शिल्लक आहे. ही कामे लवकर पूर्ण केली जात आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी दिली.
पाऊस सुरू असला तरी सुरू असलेली कामे पूर्ण केली जात आहेत. ही कामे अर्धवट अवस्थेत ठेवली तर पुन्हा ती नव्याने सुरू करताना काही तांत्रिक अडथळे येऊ शकतात. त्यामुळे या रस्ते कामातील आहे ते टप्पे पूर्ण केले जात आहेत. डोंबिवली, एमआयडीसी हद्दीत पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी काटई ते मानपाडा भागात कल्याण डोंबिवली पालिका, एमआयडीसीला जलवाहिनी टाकण्याची कामे करायची होती. पाण्याचा प्रश्न महत्वाचा असल्याने शीळफाटा रस्त्या लगतच्या या कामासाठी रस्ता रुंदीकरण, काँक्रीटीकरणाची कामे तीन ते चार महिने थांबवावी लागली. या विलंबाचा फटका रस्ते कामाला बसला आहे. अन्यथा ही कामे जूनपूर्वीच पूर्ण झाली असती, असे मुख्य अभियंता सोनटक्के यांनी सांगितले.
वाहतूक विभागाने कल्याण शहरातील वाहतुकीचा विचार करून शहरात सुरू असलेली कामे पावसाळ्यानंतर करण्याची सूचना केली आहे. ही कामे अर्धवट स्थितीत सोडून दिली तर त्या भागात नवीन समस्या निर्माण होण्याची समस्या आहे. त्यामुळे ती कामे पूर्ण करून उरलेली कामे पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा हाती घेतली जाणार आहेत. कल्याण शहरात लालचौकी, बैलबाजार भागात एमएसआरडीसीकडून रुंदीकरण, काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. पुढील टप्पा हा गुरुदेव हाॅटेल, शिवाजी चौक, सहजानंद चौक ते लाल चौकी पर्यंत आहे. ही कामे कल्याण शहराच्या मुख्य वर्दळीच्या भागात आहेत. ही कामे पावसाळ्यात सुरू ठेवली तर अभूतपुर्व वाहतूक कोंडी शहरात होऊ शकते, अशी सूचना वाहतूक विभागाने महामंडळाला केली आहे. त्यामुळे ही कामे ऑक्टोबर नंतर करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
भिवंडी-कोन बाजूकडील ९०० मीटरचे काम शिल्लक आहे. डोंबिवली-शीळ बाजू्च्या रस्त्याकडील तीन ते चार किमी रस्त्याचे काम बाकी आहे. या रस्त्यावरील ९९ टक्के कामे पूर्ण झाली आहेत, असे सोनटक्के यांनी सांगितले.
२७ गाव हद्दीत
२७ गाव हद्दीत रस्तारुंदीकरण, काँक्रीटीकरण करताना स्थानिक शेतकरी, जमीन मालक रुंदीकरणास विरोध करत आहेत. त्यामुळे या भागातील कामे रखडली. ती आता आहे त्या रस्ते हद्दीतून पूर्ण केली जात आहेत. शेतकऱ्यांचा अडथळा म्हणून ही कामे पूर्ण केली नाहीत तर रस्तारुंदीकरण करुनही प्रवाशांना नवीन रस्त्याचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे पत्रीपूल ते शीळ रस्त्यावर जी जमीन रुंदीकरण, काँक्रीटीकरण कामासाठी उपलब्ध होत आहे. त्याठिकाणी तात्काळ कामे केली जात आहेत. या रस्त्याची उरलेली एक ते दोन टक्क्याची कामे पूर्ण झाल्यानंतर शीळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडी हा विषय संपुष्टात येईल, असे मुख्य अभियंता सोनटक्के यांनी सांगितले.
कल्याण-शीळफाटा रस्ता रुंदीकरण, काँक्रीटीकरणाची ९९ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. शिल्लक कामे पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा सुरू करून या रस्त्याचा अंतीम टप्पा पूर्ण केला जाणार आहे. ही रस्ते कामे पूर्ण झाल्या नंतर वाहतूक कोंडी हा विषय संपुष्टात येईल. – शशिकांत सोनटक्के , मुख्य अभियंता ,एमएसआरडीसी, मुंबई</strong>