कल्याण: कल्याण डोंबिवली परिसरात दळणवळणाची अधिकाधिक साधने उपलब्ध करुन या भागातील प्रवाशांना जलदगतीने प्रवास करता यावा, या भागातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी अधिकाधिक रस्ते, पूल, मेट्रो मार्ग उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी कल्याण मधील कार्यक्रमात जाहीर केले होते. या आश्वासनाच्या दुसऱ्याच दिवशी कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाची १५२१ कोटीची निविदा जाहीर करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यामुळे हे काम लवकरच ठेकेदार नियुक्तीनंतर हाती घेण्यात येणार आहे. ३० महिन्याच्या कालावधीत (२०२५ पर्यंत) ठेकेदाराला हे काम पूर्ण करायचे आहे. काही तांत्रिक अडथळ्यांमुळे भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया एमएमआरडीएकडून जाहीर करण्यात येत नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांना आदेश देऊन तुम्ही तांत्रिक अडथळ्यांचे कारण देऊन निविदा प्रक्रिया रखडून ठेऊ नका. ती प्रक्रिया तात्काळ सुरू करा, असे सूचित केले होते. त्याची गंभीर दखल घेऊन आणि खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे अखेर महत्वपूर्ण अशा कल्याण-तळोजा मेट्रो १२ क्रमांकाची निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

कल्याण, भिवंडी परिसरातील प्रवाशांना ठाणे येथे न जाता थेट शिळफाटा, तळोजा मार्गे पनवेल, नवी मुंबई भागात जाता यावे. हा उद्देशातून या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवासी भार कमी होण्यास मदत होणार आहे, असे खा. शिंदे यांनी सांगितले. नवी मुंबई, पनवेल, तळोजा परिसरातील प्रवाशांना कल्याण, डोंबिवली भागात मेट्रो मार्गाने येणे सहज शक्य होणार आहे. या मार्गामुळे शिळफाटा, पनवेल-मुंब्रा-ठाणे रस्त्यावरील खासगी वाहन भार कमी होण्यास मदत होणार आहे.

कल्याण-तळोजा मेट्रो २० किमीच्या मार्गावर कल्याणमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती, गणेशनगर, पिसवली, डोंबिवलीत गोळवली, एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे, वडवली, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे, तळोजा स्थानकांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास प्रकल्पातील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हा प्रकल्प ओळखला जातो. २०१८ मध्ये या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन कल्याणमध्ये करण्यात आले होते. आता हा प्रकल्प विहित वेळेच्या अगोदर पूर्ण व्हावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील आहेत.

“कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग उभारणी कामाच्या निविदा प्रक्रिया जाहीर झाल्या आहेत. या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. विहित वेळेच्या अगोदर हा प्रकल्प पूर्ण व्हावा यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. कल्याण, भिवंडी, नवी मुंबई, पनवेल परिसरातील प्रवाशांना या मार्गिकेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.”

– खा. डाॅ. श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan taloja metro line started by 2025 tender process of 1521 crore announced ysh