लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा समाजाच्या विविध स्तरातून निषेध केला जात असतानाच, शुक्रवारी कल्याण तालुका अधिवक्ता परिषदेतर्फे कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. अधिवक्ता परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.
भारताने वेळोवेळी दहशतवाद्यांना, त्यांची पाठराखण करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे या हल्ल्याचाही योग्यवेळी भारत सरकारकडून बदला घेतला जाईल, असा विश्वास अधिवक्ता परिषदेच्या निदर्शकांनी व्यक्त केला. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या घटकांचा कायमचा बिमोड करण्यासाठी सरकारने कठोर निर्णय घ्यावेत. पहलगाम हल्ल्यामध्ये निष्पाप नागरिक कुटुंबीयांसमोर मारले गेले आहेत. या कुटुंबीयांवर कोसळलेला दुखाचा डोंगर कधीही न भरून येण्यासारखा आहे. असा प्रकार पुन्हा कधी होऊ नये यासाठी भारत सरकारने कटिबध्द व्हावे, असे आवाहन निदर्शकांनी केले.
मृत पर्यटकांच्या घरातील कर्ते पुरूष कायमचे निघून गेले आहेत. अशा कुटुंबीयांच्या घरातील मुले शिक्षण घेत आहेत. काही घरात कमावते कोणी नाही. त्यामुळे अशा कुटुंबीयांना शिक्षण, नोकरीसाठी सरकारने सर्वोतपरी मदत करावी, असे आवाहन निदर्शकांनी केले. यावेळी शिष्टमंडळाने तहसीलदार सचिन शेजळ यांना एक निवेदन दिले. यामध्ये दहशतवादी घटकांचा कायमचा बिमोड करण्याची आणि पीडित कुटुंबीयांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळेल यासाठी साहाय्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भ्याड हल्ल्यातील या निषेध कार्यक्रमात अधिवक्ता परिषद कल्याण तालुका संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रल्हाद भिलारे, तालुका पालक ॲड. सतीश अत्रे, जिल्हा सहसचिव ॲड. अर्चना सबनीस, ज्येष्ठ अधिवक्ता के. टी. जैन, कोकण प्रांत सचिव ॲड. रेखा कांबळे, महामंत्री ॲड. पुजा भालेराव, सचिव ॲड. नरेंद्र बोंद्रे, उपाध्यक्ष ॲड. नागेश कांबळे, ॲड. राजु राम, ॲड. हेमंत चव्हाण, ॲड. सुप्रिया नाईक, ॲड. रोनक कारिरा आणि इतर सदस्य उपस्थित होते.