भगवान मंडलिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण पश्चिमेतील फडके मैदान, म्हसोबा मैदान प्रभागातील डांबरी रस्ते सुस्थितीत असताना, या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे साडे सात कोटी खर्चाचे पाच प्रस्ताव बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अपरोक्ष तयार केले. या प्रस्तावांमध्ये गडबड असल्याचे आयुक्तांच्या चाणाक्ष नजरेने हेरले आणि हे सर्व प्रस्ताव आयुक्तांनी रोखून धरले. या सगळ्या प्रकाराने प्रशासनावर कोणाचाही वचक राहिला नसल्याचे आणि प्रशासनात बेदिली माजल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणावरुन स्थानिक कर्मचारी विरुध्द प्रतिनियुक्तीवरील अधिकारी अशी धुसफूस प्रशासनात सुरू झाली आहे. प्रतिनियुक्तीवरुन येणाऱ्या अधिकाऱ्यांनी गडबडी करायच्या आणि त्याची शिक्षा स्थानिक कर्मचाऱ्याला कशासाठी, अशी चर्चा कर्मचारी करत आहेत. प्रशासनातील या बेदिलीवरुन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मनसेचे आ. प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीत दूध डेअरीमधून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

सुस्थित रस्त्यांवर खर्च

शिंदे समर्थक दोन नगरसेवकांच्या फडके मैदान, म्हसोबा मैदान प्रभागातील सुस्थितीत असलेले डांबरीकरणाचे रस्ते काँक्रीटीकरणाचे करण्याचे प्रस्ताव बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले. हे प्रस्ताव शहर अभियंता विभागाकडून आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आले. शहरातील बहुतांशी रस्ते सुस्थितीत आहेत. रस्ते कामांसाठी बेताचा निधी, दायित्व असताना फडके, म्हसोबा मैदान भागातील रस्त्यांचे प्रस्ताव बांधकाम विभागाने का तयार केले. या प्रस्तावांच्या नस्तीमध्ये अर्थसकल्पीय खर्च तरतूद, दायित्व नोंदीची टिपणे नव्हती. आयुक्तांच्या मनात संशय आल्याने त्यांनी हे प्रस्ताव तयार करणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. अभियंत्यांनी आयुक्तांसमोर आर्जव केल्याने आयुक्तांनी पाच अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा काढण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले. या कार्यवाहीसाठी आयुक्तांच्या दालनातून रस्ते कामाच्या नस्ती सामान्य प्रशासन विभागाच्या साहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे यांच्या दालनात पाठविण्यात आल्या.

नस्ती गायब

साहाय्यक आयुक्त करचे यांनी आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे पाच अभियंत्यांना नोटिसीची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करुन नस्ती सामान्य प्रशासन अधीक्षक, उपायुक्त यांच्याकडे पाठविणे आवश्यक होते. करचे यांच्या दालनातून गतिमानतेने या नस्ती वरिष्ठांकडे गेल्या नाहीत. आयुक्तांनी अभियंत्याना देण्यात येणाऱ्या नोटिसीबाबत सामान्य प्रशासन विभागात विचारणा केली. तेव्हा अशाप्रकारे नोटिसा देण्यात आल्या नाहीत. ती नस्ती सामान्य प्रशासन विभागात आली नसल्याचे उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले. या नस्ती साहाय्यक आयुक्त करचे यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. अशी भूमिका आयुक्त कार्यालयाने घेतली.करचे यांनी आपण शिपायांच्या माध्यमातून नस्ती पुढे पाठविल्याची भूमिका घेतली. त्यात आयुक्तांना तथ्य आढळले नाही.

हेही वाचा >>>ठाणे: पाणीपुरी खाण्यास पैसे दिले नाही म्हणून जीवेठार मारण्याचा प्रयत्न

पोलीस पाचारण

महत्वाच्या नस्ती गायब झाल्याने आयुक्तांनी पोलीस तक्रार करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी आयुक्त कार्यालय ते साहाय्यक आयुक्त कार्यालय दरम्यानचे सीसीटीव्ही चित्रण तपासले. साहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे यांचा शिपाई लक्ष्मण दिवेकर उर्फ लकी हा त्या महत्वपूर्ण नस्ती बाहेर घेऊन जाऊन संबंधित ठेकेदाराच्या ‘खास इसमा’च्या हातात देत असल्याचे दिसले. करचे यांच्या दालनातून नस्ती बाहेर गेल्याचे आणि त्यांनी याविषयी संशयास्पद भूमिका घेतल्याने आयुक्तांनी करचे यांना फैलावर घेतले. त्यानंतर शोधाशोध केल्यावर शिपाई दिवेकर यांनी बांधलेल्या गठ्ठ्यात ‘हरविलेल्या’ नस्ती आढळून आल्या. या नस्ती कोठून आल्या याची आपणास माहिती नसल्याचे स्पष्टीकरण दिवेकर यांनी दिले. आयुक्तांनी दिवेकर यांना तात्काळ निलंबित केले. बांधकाम विभागाच्या पाच अभियंताना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. करचे यांच्या कर्तव्यकसुरतेमुळे स्थानिक शिपाई नाहक निलंबित झाला, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. करचे यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.साहाय्यक आयुक्त करचे यांना दोन दिवस संपर्क केला. त्या व्यस्त होत्या. त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

“ बांधकाम विभागाच्या काही नस्ती हरविल्या होत्या. पोलिसांत तक्रारीचे आदेश दिले होते. त्या नस्ती सापडल्या आहेत. याप्रकरणात शिपायाला निलंबित केले आहे. याप्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाणार आहे.”-डाॅ. भाऊसाहेब दांगडे,आयुक्त.

“ बांधकाम विभागाच्या नस्ती आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आल्या होत्या. त्या तेथून कोठे गेल्या याची आपणास माहिती नाही.”-अर्जुन अहिरे,शहर अभियंता.

“ बांधकाम विभागाच्या नस्ती हरविल्या होत्या. त्या सापडल्या आहेत. या नस्ती हाताळणारा शिपाई लक्ष्मण दिवेकर यांनी त्या आपल्या गठ्ठ्यात कोणी ठेवल्या याची माहिती नसल्याचे सांगितले. त्यांना निलंबित केले आहे.”-अर्चना दिवे,उपायुक्त,सामान्य प्रशासन.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan the commissioner stopped the extravagance of seven and a half crores on well maintained roads amy
Show comments