दिवाळी सणाच्या मागील तीन ते चार दिवसाच्या काळात प्रवाशांना विलंबाने धावणाऱ्या लोकलचा फटका बसत आहे. सणासुदीच्या काळात तरी मध्य रेल्वेने लोकल सेवा सुरळीत ठेवणे अपेक्षित असताना गुरुवारी सकाळीच अंबरनाथ-बदलापूर रेल्व स्थानकांच्या दरम्यान काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने मुंबईकडून कर्जत, कसाराकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली.

हेही वाचा >>>VIDEO : दुचाकीवरून आले आणि थेट फटाक्यांच्यामाळेवर कोसळले ; अंबरनाथमध्ये स्टंटबाज दुचाकीस्वारांची फजिती

कल्याण कडून मुंबईकडे जाणाऱ्या कल्याण-डोंबिवली, दिवा, कळवा, ठाणे रेल्वे स्थानकांपर्यंतच्या फलाटांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती.
अर्धा तास लोकल उशिराने धावत आहेत, असे प्रवाशांनी सांगितले. पश्चिम रेल्वेच्या लोकल काटेकोर वेळेत धावतात. तसे नियोजन मध्य रेल्वेला का करता येत नाही, असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत होते. दिवाळी नंतर गुरुवारी कार्यालयीन कामाचा पहिला दिवस असल्याने प्रत्येकाची कामावर वेळेत पोहचण्याची घाई असते. अलीकडे कार्यालयात वेळेवर पोहचण्याचे वरिष्ठांचे निर्देश असल्याने प्रत्येकाची वेळेत पोहचण्याची धडपड असते. त्यात लोकल विलंबाने धावत असल्याने कार्यालयात वेळेवर पोहचणे शक्य नसल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.सणासुदीच्या काळात लोक मोठ्या संख्येने घरा बाहेर पडतात. हे माहिती असुनही दोन दिवसापूर्वी मध्य रेल्वेने सोमवारी रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल सोडून प्रवाशांची अडचण केली. रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल सोडल्यास अनेक लोकल रद्द केल्या जातात, असे प्रवाशांनी सांगितले. सोमवारपासून मध्य रेल्वेच्या मार्गावर लोकल विलंबाने धावत आहेत. हा प्रकार सतत सुरू राहिल्यास प्रवाशांचा उद्रेक होईल, अशी भीती संतप्त प्रवाशांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>ठाणे शहरात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ

सोमवारी सकाळी अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे मार्गावर काही तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्याचा फटका लोकल सेवेला बसला आहे. सुरुवातीला लोकल अर्धा तास उशिराने धावत होत्या. बिघाड दुरुस्त केल्यानंतर ही वेळ पंधरा मिनीटावर आली असे प्रवाशांनी सांगितले. आता पाऊस गेला आहे. त्यामुळे रेल्वे मार्गात पाणी तुंबणे वगैरे प्रकार नसल्याने मध्य रेल्वेने वेळेत लोकल सोडण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.अंबरनाथ येथील तांत्रिक बिघाडाची माहिती घेण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.