कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत टिटवाळा-मांडा परिसरात गेल्या काही वर्षात उभारण्यात आलेली ८०० हून अधिक बेकायदा बांधकामे मागील २५ दिवसात अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी भुईसपाट केली. या बेकायदा बांधकामांविरुध्दची कारवाई टिटवाळा परिसरात सुरू असताना, आता बेकायदा बांधकामे उभारणाऱ्या बांधकामधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. बुधवारी टिटवाळा पोलीस ठाण्यात पाच बेकायदा बांधकामधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
किताबुल्ला शेख, बैतुल्ला शेख, मुखलीस खालीक काबाडी, इफतीकार खालीक काबाडी, जुल्फकार खालीक काबाडी यांच्या विरुध्द महाराष्ट्र प्रादेशक व नगररचना नियोजन आणि महापालिका अधिनयमाने हे गुन्हे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या आदेशावरून अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, अधीक्षक शिरीष गर्गे यांनी दाखल केले.
अधीक्षक गर्गे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, मुखलीस काबाडी, इफ्तीकार, जुल्फेकार यांनी सर्वे क्रमांक १७८ या भूक्षेत्रावर पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता बेकायदा बांधकामे उभारण्यासाठी जोत्यांची बांधकामे करून ठेवली होती. याविषयी अ प्रभागात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे (निलंबित) यांनी तिन्ही बांधकामधारकांना बांधकामाच्या अधिकृततेची कागदपत्रे अ प्रभागात सादर करण्याची नोटीस बजावली होती. विहित वेळेत ही कागदपत्रे तिन्ही बांधकामधारक सादर करू शकले नाहीत. रोकडे यांनी ही बांधकाम अनधिकृत घोषित केली होती. ही बांधकामे तोडण्याची कारवाई व एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई रोकडे यांनी केली नव्हती.
टिटवाळ्यातील बल्याणी भागात आदिवासी पाड्या जवळ पाण्याच्या टाकीजवळ किताबबुल्ला, बैतुल्ला शेख यांंनी पाच गाळ्यांची बेकायदा बांधकामे केली होती. तत्कालीन साहाय्यक आयुक्त रोकडे यांंनी बांधकामधारकांना नोटिसा पाठवून बांधकामाची कागदपत्रे अ प्रभागात दाखल करण्याचे आदेश दिले होते. बांंधकामधारकांनी कोणतीही कागदपत्रे अ प्रभागात सादर केली नाहीत. रोकडे यांनी ज्या पाच जणांच्या बेकायदा बांधकामांंवर कारवाई केली नाही. ती बांधकामे अनधिकृत घोषित करून त्या बांधकामधारकांवर विद्यमान साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी बुधवारी एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले. यापूर्वी रोकडे यांनी नोटिसा दिलेली, पण एमआरटीपी, अनधिकृत घोषित न केलेली प्रकरणे बाहेर काढून त्यांच्या विरुध्द साहाय्यक आयुक्त पाटील यांनी कारवाई सुरू केली आहे.
बेकायदा बांधकाम करणाऱ्यांविरुध्द पहिले एमआरटीपीचा गुन्हा आणि नंतर ते बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश आयुक्त डाॅ. जाखड यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे यापूर्वीची जुनी बेकायदा बांधकामांची प्रकरणे बाहेर काढून त्यांच्यांवर एमआरटीपीचा गुन्हा आणि त्यानंतर ती सर्व बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे. टिटवाळ्यातील कारवाईने नवीन बांधकामे ठप्प झाली आहेत.
प्रमोद पाटील (साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग)