पेब किल्ल्यावरुन ५०० फूट खाली कोसळलेल्या एका ट्रेकरची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. रमेश कुमार रामनाथन असं ३० वर्षीय ट्रेकरचं नाव असून तो मुळचा कल्याणचा आहे. रमेश आपल्या मित्रांसोबत ट्रेकसाठी गेला असता शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पेब किल्ल्यावरुन खाली कोसळला होता. पोलीस, नेरळ ग्रामस्थ आणि सह्याद्री मित्र मंडळाच्या सहाय्याने रमेशची सुखरुप सुटका कऱण्यात आली आहे.
रमेशने मित्रांसोबत सकाळी सात वाजता ट्रेकिंगला सुरुवात केली होती. नऊ वाजण्याच्या सुमारास ते सर्वजण पेब किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले होते. यावेळी रमेशच्या हातातून त्याची बॅग खाली पडल्याने ग्रुपने थांबण्याचा निर्णय घेतला.
टेलीमार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणारा रमेश बॅग आणण्यासाठी खाली उतरला असता अर्ध्या रस्त्यात त्याचा पाय घसरला आणि काही हजार फूट खाली जाऊन कोसळला. एका मोठ्या खडकावर रमेश अडकला होता. एक तास होऊनही रमेश परतला नसल्याने त्याच्या मित्रांनी नेरळ पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान मोबाइलच्या सहाय्याने त्यांनी रमेशशी संपर्क साधला. यावेळी रमेशने फोटोच्या सहाय्याने आपण अडकलो असलेल्या जागेची माहिती दिली.
“रमेश जवळपास ५०० फूट खाली कोसळला होता. बचावसाहित्याच्या मदतीने पोलीस, सह्याद्री मित्र मंडळ आणि नेरळ ग्रामस्थांनी रमेशला बाहेर काढलं. रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास बचावकार्य संपलं. सध्या तो सुरक्षित असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,” अशी माहिती नेरळ पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल घनश्याम पालवे यांनी दिली आहे.
रमेशसोबत ट्रेकमध्ये सहभागी झालेल्या राजदत्त चव्हाण याने सांगितल्यानुसार, “पेब किल्ल्यावर चढत असताना अर्ध्या रस्त्यात रमेशची बॅग घसरली आणि खाली पडली. ४० फुटांवर बॅग दिसत होती. रमेश बॅग आणण्यासाठी गेला आणि जळपास एक तास त्याच्यासोबत संपर्क तुटला. आम्ही पोलिसांना कळवलं होतं. पण यादरम्यान मोबाइलवरुन संपर्क साधण्याचाही सतत प्रयत्न करत होतो”.
“जवळपास एका तासाने रमेशने आपण एका खडकावर अडकलो असल्याचं कळवलं. यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं. इतक्या उंचीवरुन पडून आणि जखमी झाल्यानंतरही रमेश बचाव पथकासोबत दोन तास चालला. रमेश याआधीही पेब किल्ल्यावर आला होता. पण त्यावेळी त्याने दुसऱ्या मार्गाचा वापर केला होता,” असंही राजदत्त चव्हाणने सांगितलं.
“रमेशने लोकेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. डोक्याला जखम झाली असताना आणि उजव्या हाताला फ्रॅक्चर झालं असतानाही रमेश धीराने वागत होता. सध्या कल्याणमधील फोर्टीज रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तो आपली आई आणि बहिणीसोबत राहतो. आम्ही नेरुळ ग्रामस्थ, सह्याद्री मित्र मंडळ आणि पोलिसांचे आभारी आहोत,” असं रमेशचा मित्र जितेंद्र रावल याने म्हटलं आहे.