कल्याण पश्चिमेत बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत वाहतुकीचे नियोजन करत असताना एका वाहतूक पोलिसाला हेतुपुरस्सर दुचाकीची धडक देऊन त्याला गंभीर दुखापत केली. जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या वाहतूक पोलिसाला रुग्णालयात घेऊन जाण्या ऐवजी घटनास्थळा वरुन पळून जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी सोमवारी दोन वर्ष कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
हेही वाचा >>> ठाणे : कोपरीला वाढीव वाढीव पाणी मिळाले तरी पाणी टंचाई मात्र कायम ; अनेक इमारतींमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा
तसेच, या प्रकरणातील अन्य एका गुन्ह्यात सहा महिने सक्त कारावासाची आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली. मोटार वाहन कायद्याने दंड न भरल्यास १० दिवस सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.अजित नामदेव ठाकरे असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. सचिन कुलकर्णी यांनी काम पाहिले. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील हवालदार एकनाथ तायडे, अंमलदार सदानंद म्हात्रे यांनी न्यायालय आणि पोलीस ठाणे यांच्या दरम्यान सादरकर्ता अधिकारी म्हणून काम पाहिले. घटना घडणे, गुन्हा दाखल झाल्यापासून ते महत्वपूर्ण दस्तऐवज न्यायालयात सादर करण्यात हवालदार तायडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
हवालदार एकनाथ तायडे यांनी सांगितले, नऊ वर्षापूर्वी कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत एका चौकात कल्याण वाहतूक विभागाचे पोलीस वाहूतक नियोजनाचे काम करत होते. चौकात वाहतूक कोंडी झाल्याने नियोजन करुन वाहने पुढे सोडण्याचे काम चौकातील गस्ती वरील वाहतूक पोलीस करत होते. चौकात वाहतूक पोलीस तैनात असताना अजित ठाकरे हा वेगाने दुचाकी घेऊन वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन चौकातून भरधाव वेगाने वाहतूक पोलिसांना न जुमानता पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. चौकात इतर सगळी वाहने थांबली असताना हा दुचाकी स्वार वेगाने का जात आहे म्हणून चौकातील एका वाहतूक पोलिसाने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुचाकी स्वार अजित तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.
हेही वाचा >>> भिवंडी-कल्याण शिळफाटा रस्त्याच्या ५६१ कोटींच्या वाढीव खर्चास मान्यता
वाहतूक पोलिसाने दुचाकीच्या पुढे जाऊन त्याला वाहतूक नियमांचा भंग केल्या बद्दल दंड भरण्याची तंबी दिली. त्याचा अजित ठाकरेला राग आला. त्याने वेगाने एक्सलेटर मारुन दुचाकी वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली. जोराची धडक बसल्याने पोलीस गंभीर दुखापत होऊन खाली पडला. दुचाकी स्वार आणि वाहतूक पोलीस यांची बाचाबाची सुरू असताना पोलिसाने दुचाकी स्वाराचा वाहन क्रमांक लक्षात ठेवला होता. वाहतूक पोलीस दुचाकीच्या ठोकरीत खाली पडताच अजित ठाकरे चौकातून सुसाट वेगाने पळून गेला. याप्रकरणी वाहतक पोलिसाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात वाहन क्रमांकाच्या आधारे अजित ठाकरे यांचे नाव शोधून त्याच्या विरुध्द तक्रार केली होती. पोलिसांनी या तक्रारी वरुन वाहतूक नियमांचा भंग, सरकारी कामात अडथळा आणि मोटार वाहन कायद्याने गुन्हा दाखल करुन अजितला अटक केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. नऊ वर्ष हे प्रकरण कल्याण जिल्हा न्यायालयात सुरू होते.
न्यायालयाने अजित ठाकरे विरुध्द असलेल्या सबळ कागदपत्रांचा आधार घेत त्याला दोन वर्ष कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
दुचाकी स्वारांनी वाहतूक नियोजनाचे काम करणाऱ्या वाहतूक पोलिसाशी गैरवर्तन केले. वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविले तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असा संदेश या निकालामुळे समाजात गेला आहे, असे सरकारी वकील ॲड. सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.