कल्याण – महायुती, महाविकास आघाडीचे नेते कल्याण पूर्व, पश्चिमेतील विधानसभेसाठी इच्छुक नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यास अपयशी ठरले आहेत. त्यामुळे भाजपचे नरेंद्र पवार, शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी पक्षश्रेष्ठींकडून होणाऱ्या कारवाईची तमा न बाळगता सोमवारी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांना दाखल केले.

सोमवार मुहुर्ताचा चांगला दिवस असल्याने भाजपचे नरेंद्र पवार यांनी अपक्ष म्हणून कल्याण पश्चिमेतून उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी नरेंद्र पवार शक्तिप्रदर्शन करत आपल्या कार्यकर्त्यांसह दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या उमेदवारी अर्जामुळे भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे प्रदेश नेते पवार यांची समजूत काढण्यात अपयशी ठरले आहेत.

पाच वर्षापूर्वी नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिमेतून भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. भाजप, संघाचा मोठा मतदार या मतदारसंघात आहे. ही ताकद ओळखून पवार यांनी पक्ष कारवाईची तमा न बाळगता उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली. तीन वर्षापासून पवार कल्याण पश्चिम मतदारसंघात विविध प्रकारचे उपक्रम राबवून जनसंघटन करत होते. या बळावर आपण ही निवडणूक लढवित असल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले.

हेही वाचा >>> भाजपचे नेते उमेदवारीसाठी शिंदे सेनेत

पवार यांची उमेदवारी महायुतीचे कल्याण पश्चिमेतील उमेदवार विश्वनाथ भोईर यांची डोकेदुखी वाढविणारी आहे. या मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अभ्यासू, माजी नगरसेवक सचिन बासरे निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघातून शहरप्रमुख रवी पाटील इच्छुक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर भोईर यांनी त्यांच्या एकनिष्ठ राहण्याची भूमिका घेतली. त्याची पोचपावती म्हणून त्यांना पुन्हा उमेदवारीच्या माध्यमातून मिळाली आहे.

कल्याण पूर्वेतून महायुतीच्या उमेदवार म्हणून सुलभा गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघातून शिंदे शिवसेनेच्या एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्ज दाखल करू नये असे शिवसेना वरिष्ठांचे आदेश होते. या आदेशामुळे काही इच्छुक शांत झाले. आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारामुळे दुखावलेले शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी मात्र पक्षादेश बाजुला ठेवत सोमवारी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये उमेदवारी न दिल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर पाटील या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्वेतून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. दोघांनीही कल्याणमध्ये काँग्रेसला उमेदवारी न देण्यात आल्याने पदाचे राजीनामे दिले आहेत.

पंधरा वर्ष कल्याण पूर्वेचे शोषण झाले. सामान्य लोकांना आता विकास पाहिजे म्हणून त्यांच्या मागणीप्रमाणे आपण ही निवडणूक लढवित आहोत. ठाकरे गटाच्या यापूर्वीच्या उमेदवाराला आताच्या महायुतीच्या उमेदवाराने मदत केली होती. त्यामुळे बंडखोरीची भाषाला आम्हाली कोणी शिकवू नये. महेश गायकवाड– शहरप्रमुख, शिंदे शिवसेना.

महेश गायकवाड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीत शिवसेनेच्या कोणीही कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांनी सामील होऊ नये. महायुतीचा धर्म सर्वांनी पाळायचा आहे. जे या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गोपाळ लांडगे- जिल्हाप्रमुख, शिंदे शिवसेना.