Rakesh Mutha Kalyan West Constituency: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रचारावर भर देत आहे. कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. पण काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह हा नेत्यांच्या अंगलट येताना दिसत आहे. कल्याण पश्चिम विधानसभेतील जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह त्यांच्या जीवावर बेतला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या दुर्घटनेतून राकेश मुथा थोडक्यात बचावले असले तरी सदर दुर्घटनेचे गंभीर परिणाम होऊ शकले असते.
नेमके काय झाले?
राकेश मुथा रविवारी रात्री उशिरा प्रचार करत असताना भोईरवाडी परिसरात त्यांच्या स्वागतासाठी दीडशे किलो वजनाचा भव्य हार तयार करण्यात आला होता. हा हार क्रेनच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यात टाकण्यात आला. मात्र, हारासोबत लावलेल्या इलेक्ट्रिक स्पार्कर्स फटाक्यांची ठिणगी उडाली आणि ती मुथा यांच्या डोक्याला लागली. या कारणाने त्यांच्या केसांनी पेट घेतला. मात्र, उपस्थित कार्यकर्त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून आग विझवली.
यानंतरही राकेश मुथा कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहिले. त्यांच्या हावभावामुळे त्यांना अधिक दुखापत झालेली नसल्याचे दिसून आले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांचा अतिरेकी उत्साह हा धोका निर्माण करू शकतो, हेच या घटनेवरून दिसून आले.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच राकेश मुथा यांचे बॅनर फाडल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. महापालिका अधिकारी जाणूनबुजून बॅनर फाडत असल्याचा आरोप करून मुथा यांनी निषेध आंदोलन करत दोन तास ठिय्या दिला होता. गेल्या काही दिवसांपासून राकेश मुथा यांचे बॅनर वारंवार फाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. विरोधकांना पराभव दिसत असल्यामुळेच त्यांच्याकडून हे कृत्य केले जात असल्याचा आरोप मुथा यांनी केला. तसेच महापालिका अधिकारी कुणाच्यातरी दबावात काम करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.